“महापालिका निवडणुकीच्या कामाला लागा”; DCM शिंदेंचे कार्यकर्त्यांना आदेश, ठाकरेंवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 21:10 IST2025-02-06T21:07:54+5:302025-02-06T21:10:13+5:30
Deputy CM Eknath Shinde News: सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते. मला काय मिळाले यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळाले हे पाहिले पाहिजे. कार्यकर्ते जोडा, कार्यकर्ता जपा. निवडणुकीच्या कामाला लागा, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

“महापालिका निवडणुकीच्या कामाला लागा”; DCM शिंदेंचे कार्यकर्त्यांना आदेश, ठाकरेंवर टीका
Deputy CM Eknath Shinde News: सगळ्यांनी मनापासून संकल्प केला तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेला भरघोस यश मिळेल. नांदेडमध्ये शिवसेनेचे तीन आणि महायुतीचे सगळे मिळून नऊ आमदार निवडून आणले आहेत. आता मुंबईत ठरलेले मतदारसंघ वगळता कोणीही मतदारसंघ सोडणार नाही. आमदारकीच्या निवडणुका झाल्या आहेत, आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हे आता आपले फाउंडेशन आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले.
एका कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. मुख्यमंत्र्यांचे फक्त मंत्रालयात बसायचे काम नाही, फेसबुक लाइव्ह नाही, तर फेस टू फेस काम करायचे असते. गरम पाणी प्या, तोंडाला मास्क लावा, एवढ्या पुरते काम नाही. लोकांना भेटावे लागते, शेतकऱ्यांच्या बांधावर जावे लागते, बहिणींना भेटावे लागते, भावाला भेटावे लागते. मी जिथे जातो तिथेच मंत्रालय सुरू होते, ऑन द स्पॉट काम करतो. अडीच वर्षात एवढ्या सह्या केल्या सर्व रेकॉर्ड मोडले, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ४६० कोटी रुपये दिले, किती लोकांचे जीव वाचले, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
कार्यकर्ते जोडा, कार्यकर्ता जपा
सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते. मला काय मिळाले यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळाले हे पाहिले पाहिजे. विश्वास, प्रामाणिकपणा विकत घेता येत नाही, ही आपल्या शिवसैनिकांची पुंजी आहे. कार्यकर्ते जोडा, कार्यकर्ता जपा, पदाधिकारी नेमताना जवळचा परका असा भेदभाव करू नका, जे आपण पेरले ते उगवले, विधानसभेत इतक्या जागा येणे म्हणजे सुवर्ण अक्षराने नोंद करावा असा इतिहास आहे. सगळ्या महाराष्ट्रातून शिवसेनेत प्रवेश होत आहेत. प्रवेशांना वेग आला आहे, आपल्या पक्षात कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
दरम्यान, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार घेऊन आपण पुढे चाललो आहोत. बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आणि खरी शिवसेना कोण हे मतदारांनी विधानसभा निवडणुकीत दाखवून दिले. शिवसेना वाढत असून राज्यभरातून ठाकरे गट आणि इतर पक्षांतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ठाकरे गटाचे परभणी जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनीही शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचेही मनापासून स्वागत केले, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.