“पदापेक्षा जनतेला काय मिळेल ते महत्त्वाचे”; पालकमंत्रीपद तिढ्यावर DCM एकनाथ शिंदे थेट बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 20:08 IST2025-01-31T20:04:32+5:302025-01-31T20:08:01+5:30
Deputy CM Eknath Shinde News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसहून येऊन अनेक दिवस उलटले तरी अद्याप नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.

“पदापेक्षा जनतेला काय मिळेल ते महत्त्वाचे”; पालकमंत्रीपद तिढ्यावर DCM एकनाथ शिंदे थेट बोलले
Deputy CM Eknath Shinde News: २०२४मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली. मंत्रिमंडळ, मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप यांवरून महायुतीत चांगल्याच कुरबुरी झाल्याचे पाहायला मिळाले. नाराजीचे मानापमान नाट्य रंगले. आता पालकमंत्रीपदावरून महायुतीत सारेकाही आलबेल नसल्याचे सांगितले जात आहे. नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही कायम आहे. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले.
नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत बिघाडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. पालकमंत्रीपदाची यादी जाहीर केल्यानंतर लगेचच नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्त्यांना स्थगिती देण्यात आली होती. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. गोगावले समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यामुळे आता या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत काय निर्णय होतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
पदापेक्षा जनतेला काय मिळेल ते महत्त्वाचे
पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटेल, तुम्ही काही काळजी करू नका. आम्हाला पदापेक्षा या महाराष्ट्रातील जनतेची सेवा करायची आहे. महाराष्ट्राला पुढे न्यायचे आहे. जो विकास आम्ही अडीच वर्षे केला, तो अधिक वेगवान गतीने करायचा आहे. आम्हाला पदांपेक्षा जनतेची नाळ महत्त्वाची आहे. मला काय मिळाले यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेला काय मिळणार, हे पाहणारे आम्ही लोक आहोत, असे सांगत कोट मंत्रिपदासाठी असतो, पालकमंत्रीपदासाठी नाही, असा टोलाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसहून आले की, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी एक बैठक घेऊन पालकमंत्रीपदाचा तिढा सोडवला जाऊ शकतो, असे म्हटले जात होते. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार खटके उडताना दिसत आहे. सुनील तटकरे यांना रायगड जिल्ह्यात फिरू न देण्याची भाषा शिवसेना शिंदे गटाकडून केली जात आहे. भरत गोगावले यांचे समर्थक या प्रकरणी चांगलेच आक्रमक झाले आहेत. नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कसा सोडवला जातो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.