"कुणाला प्रयोग करायचा असेल तर..."; झिरवाळांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, "जे बोलतात त्यांना..."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 08:30 AM2024-10-08T08:30:58+5:302024-10-08T08:35:39+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Narhari Zirwal on Raj Thackeray : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून सुरक्षा जाळीवर उडी मारली होती. नरहरी झिरवळ यांनी आदिवासी आमदारांसोबत आंदोलन केले. किरण लहामटे, काशीराम पावरा हे आमदार आंदोलनात सहभागी झाले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना सुखरूपपणे बाहेर काढले. मात्र या आंदोलनावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरहरी झिरवाळ यांना दोनदा लक्ष्य केलं होतं. झिरवाळ यांच्या आंदोलनानंतर तुम्ही निषेध कसले नोंदवताय? असा सवाल राज ठाकरे यांनी केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकारणातल्या लोकांना जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारायला लावल्या पाहिजे असा अप्रत्यक्ष टोला झिरवाळ यांना लगावला. या सगळ्यावर आता नरहरी झिरवाळांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याच्या मागणीला आदिवासी नेते आणि उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी कडाडून विरोध केला होता. आदिवासींची पेगाअंतर्गत रखडलेली भरती आणि धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्यास विरोध करण्यासाठी काही आमदारांनी आमदारांनी मंत्रालयात आंदोलन केले होते. आमदार नरहरी झिरवाळ, राजेश पाटील, भाजपचे काशीराम पावरा, भाजपचे खासदार हेमंत सावरांनी मंत्रालयातील संरक्षण जाळीवरच उड्या मारल्या. या सगळ्या प्रकारावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत खडेबोल सुनावले होते.
"सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष श्री. नरहरी झिरवळ यांनी आणि इतर दोन आमदारांनी , आदिवासी समाजवर होणाऱ्या अन्यायाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मंत्रालयात संरक्षक जाळीवर उड्या मारून, म्हणे यांनी निषेध नोंदवला. हा कुठला निषेध? सत्तेशिवाय राहू शकत नाही, असं म्हणणं शक्य नव्हतं, म्हणून 'जनतेच्या सेवेला सत्ता हवी', म्हणत तुम्हीच आणि तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्यात ना?," अशी पोस्ट राज ठाकरे यांनी केली होती.
त्यानंतर सोमवारी एका कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा नरहरी झिरवाळ यांना नाव न घेता टोला लगावला. आज महाराष्ट्राचा राजकारणाचा खेळ झाला आहे, महाराष्ट्राची सर्कस झाली आहे. कोणी विदुषकी चाळे करतंय, कोणी मंत्रालयात जाळ्यांवर उड्या मारतंय. खरंतर महाराष्ट्रातील राजकारणात असे लोक आहेत, ज्यांना जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारायला लावल्या पाहिजेत, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. आता नरहरी झिरवाळ यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
आदिवासी कुठंही उडी मारु शकतो - नरहरी झिरवाळ
"राजकारणाची सर्कस झाली असेल तर मी सर्कस किंवा तमाशा करो, पण माझ्या आदिवासी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे. ज्या काही १७ संवर्गांना आजपासूनच आदेश दिला आहे. कुणाला नाटक दिसो, सर्कस दिसो काहीही दिसो. ज्या रखडलेल्या गोष्टीही पुढे जात आहेत इतक्या दिवसांत का आल्या नव्हत्या? मी आंदोलन राजकारणासाठी केलं असेन किंवा कुठला हेतू ठेवून केलं असेल. पण मुलांचं हित तर होतं आहे. मी जाळी नसलेल्या ठिकाणीही उडी मारु शकतो, मी आदिवासी आहे. आदिवासी कुठंही उडी मारु शकतो. जाळी होती हे खरं आहे. ज्यांना कुणाला प्रयोग करायचा असेल तर डबल जाळी लावून फक्त उडी मारुन दाखवा तेवढ्या उंचीवरुन. राज ठाकरेंना आव्हान देतो असं नाही, जे कुणीही बोलतात त्यांना मी आव्हान देत आहे. समाजाचं भलं होणार असेल तर मीच नाही अनेक लोक उड्या मारतील.” असं नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं आहे.