त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि।
By admin | Published: September 13, 2015 05:00 AM2015-09-13T05:00:52+5:302015-09-13T05:00:52+5:30
‘ज्ञान हाच परमात्मा’ असे सांगणारी आर्य, सनातन वैदिक धर्मसंस्कृती ही एकमेव अद्वितीय अशी संस्कृती आहे. याच ज्ञानप्रधान, ज्ञाननिष्ठ, ज्ञानमूल संस्कृतीचा प्रकट
- पं. वसंत अ. गाडगीळ
‘ज्ञान हाच परमात्मा’ असे सांगणारी आर्य, सनातन वैदिक धर्मसंस्कृती ही एकमेव अद्वितीय अशी संस्कृती आहे. याच ज्ञानप्रधान, ज्ञाननिष्ठ, ज्ञानमूल संस्कृतीचा प्रकट अवतार म्हणजेच आज सर्वत्र नुसती रूढ नव्हे दृढमूल झालेली गणेशोपासना. त्याचे आजचे नाव आहे गणेशोत्सव.
नेमेचि येणारा वार्षिक गणेशोत्सव पुण्यात गेली ६६ वर्षे मी अगदी जवळून प्रत्यक्ष सहभागाने आणि दुरूनसुद्धा निरीक्षक म्हणून पाहात असताना मला जाणवले, की सृष्टीच्या प्रारंभ काळापासूनच म्हणजे भारताला ज्ञात अशा अति प्राचीन वेदकाळापासून आर्य, सनातन, वैदिक धर्माने ज्या ज्या दैवत उपासना प्रत्यक्ष व्यवहारात आचरणात, जनजीवनात नुसत्या सांभाळून ठेवल्या नाहीत, तर नवनवीन कालानुरूपे उपक्रमांनी त्यांना आपापल्या छंदांचे स्वरूपाने जित्याजागत्या सर्वव्यापी ठेवल्या त्या सर्व प्रवृत्तींचे मूळ सोज्वळ, सात्विक, सर्वकल्याणकारक असे आहे आणि ते म्हणजे परमेश्वराचे सर्वव्यापक, सर्वस्पर्शी स्वरूप ज्ञान. ‘ज्ञान हाच परमात्मा’ असे सांगणारी आर्य, सनातन वैदिक धर्मसंस्कृती ही एकमेव अद्वितीय अशी संस्कृती आहे. याच ज्ञानप्रधान, ज्ञाननिष्ठ, ज्ञानमूल संस्कृतीचा प्रकट अवतार म्हणजेच आज सर्वत्र नुसती रूढ नव्हे दृढमूल झालेली गणेशोपासना. त्याचे आजचे नाव आहे गणेशोत्सव.
शे-सव्वाशे वर्षांपूर्वी व्यक्तिगत, घरगुती उपासना असणाऱ्या श्रीगणेशोपासना श्रीगणेशव्रत, श्रीगणेश प्राणप्रतिष्ठा, पूजा यांना घरगुती चार भिंतीच्या कोंदट कुंपणातून भरचौकात रस्त्यावर गावोगावी, खेडोपाडी प्रत्येक हृदयात सर्वप्रथम कोणी पोचविले असेल, तर ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या सर्वश्रेष्ठ श्रीगणेशोपासकांनी. ’स्वराज्य, स्वातंत्र्य हा माझा जन्म सिद्ध अधिकार आहे’, अशी उद्घोषणा साऱ्या भारतीय स्वातंत्र्येच्छुक प्रजाजनांच्या अंत:करणात प्रज्वलित करून नवरात्री महोत्सवातील नंदादीपाप्रमाणे सतत प्रज्वलित अखंड ठेवणारी ठरली. ही तर भारताला (त्यावेळी परतंत्र, आज स्वतंत्र असणाऱ्या) मिळालेली दैैवदुर्लभ देणगीच मानावी लागेल.
आज आतातर (६८ वर्षांपूर्वी) स्वराज्य, स्वातंत्र्य मिळाले. लोकमान्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे. आता सार्वजनिक गणेशोत्सवाचे फॅ ड आता का चालू ठेवायचे, असे कोणी विचारले तर? त्याच्या अज्ञानाची कीव करावी तेवढी थोडीच म्हणावी लागेल.
सर्वसामान्य जनता आज गणेशोत्सव ज्या मोठ्या उत्साहात, थाटामाटात, स्वत:चे सर्वस्व वेचूनसुद्धा पार पाडते त्यापैैकी किती टक्के जनतेला जनमानसाला श्रीगणेशोपासना म्हणजेच शुद्धविशुद्ध ज्ञानोपासना, ज्ञानाचा नंदादीप अखंडित ठेवण्याचे जीवनव्रत, त्याची जाण असते आणि तशी प्रवृत्ती असते, असा मला प्रश्न पडतो.
आज मौंजीबंधन-उपनयन-मुंज समारंभाच्या थाटामाटात ही ज्ञानसाधनेची श्रीगणेशा करणारी गंगोत्री हा भावच नष्ट होऊ लागला आहे. तद्वतच श्रीगणेशोत्सव हा वर्गणी अधिकाधिक (भल्याबुऱ्या मार्गाने) जमवून मोठ्या नेत्रदीपक, चित्तहारक थाटामाटाने साजरा करण्याचा एकमात्र महोत्सव असे वाटत असेल तर अनपेक्षित वा अनिष्ट काहीच नाही; परंतु ज्याला गणेशोपासना ही त्वं ज्ञानमय: विज्ञामय: असि। या अथर्वशीर्षपाठांच्या शिकवणीप्रमाणेच आपण केली पाहिजे़ ज्ञानसंवर्धक-प्रसारक-संरक्षक असे उपक्रमच हाती घेतले ते सुुफल, सत्फल करून दाखविले तरच ती खरी ज्ञानोपासना, विज्ञानोपासना याची जाण असते याचा जरा शोध घेतला तर?
वर्गणी किती जमली, गर्दी किती खेचली, उलाढाल एकूण किती लाखांनी, कोटींनी वाढली याची सुरस, सुचित्र वर्णने वृत्तपत्रांचे स्तंभ भरभरून वाचायला मिळतात; परंतु श्रीगणेश ही उपासना अथर्वशीर्ष फार प्राचीन काळापासून सांगते आहे,़ गणपती बाप्पा तू ज्ञानमयच आहेस आणि विज्ञानमय आहेस. त्याप्रमाणे ज्ञान-विज्ञानप्रधान उपासना, महोत्सव नसेल तर सारा थाटमाट, सारी प्रचंड कोटीकोटीची उलाढाल, खर्ची पडत असलेली प्रचंड (हॉर्सपॉवर) शक्ती वाया जात आहे, असे एखाद्याला वाटणे हा अपराध असेल का?
श्री गणेशोत्सवात जे मंत्र म्हटले जातात, ऐकले जातात, दूरध्वनिक्षेपकांवरून मोठमोठ्याने ऐकविले जातात त्यापैकी मंत्रांचे तात्पर्य भाषेतून भक्तांना, श्रोत्यांना सांगितले जाते का, पटविले जाते का, याचे उत्तर प्रत्येकानेच शोधावे. असे झाले तर श्रीगणेशाचे लाडके उपासक ज्ञानोपासक, विज्ञानोपासक होतील आणि तेच या गणेशोत्सवाचे फलित असेल.
ज्ञानोपासनेची आस हवी
सर्वसामान्य जनता आज गणेशोत्सव ज्या मोठ्या उत्साहात, थाटामाटात, स्वत:चे सर्वस्व वेचूनसुद्धा पार पाडते, त्यापैैकी किती टक्के जनतेला जनमानसाला श्रीगणेशोपासना म्हणजेच शुद्धविशुद्ध ज्ञानोपासना, ज्ञानाचा नंदादीप अखंडित ठेवण्याचे जीवनव्रत त्याची जाण असते आणि तशी प्रवृत्ती असते? असा मला
प्रश्न पडतो.