उद्योगांसाठीचे परवाने कमी करणार - देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2017 03:34 AM2017-01-06T03:34:35+5:302017-01-06T03:34:35+5:30
उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या ७६ परवान्यांची अट कमी करून ती २६ वर आणली. परवान्यांची ही संख्या आणखी कमी करण्याचा विचार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एक्स्पोच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले.
औरंगाबाद : उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या ७६ परवान्यांची अट कमी करून ती २६ वर आणली. परवान्यांची ही संख्या आणखी कमी करण्याचा विचार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एक्स्पोच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले.
आॅटो इंडस्ट्रीला लागणारे सुटे पार्ट्स तयार करण्यात मराठवाड्याचा हात कुणीही धरणार नाही. औरंगाबाद तर आॅटो हब आहे. त्यामुळे आगामी काळात हे शहर उद्योगात अग्रगण्य म्हणून गणले जाईल, असे सांगून सुभाष देसाई म्हणाले, राज्यात उद्योग सुरू करणे म्हणजे कटकटींना आमंत्रण असे चित्र मागच्या सरकारच्या काळात होते. त्यामुळे उद्योग येण्याचे प्रमाण घटले होते; परंतु मागील काही महिन्यांचा आढावा घेतला तर भारतातील एकूण गुंतवणुकीपैकी ५० टक्के परकीय गुंतवणूकमहाराष्ट्रात आली आहे. ६८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात झाली आहे.
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले, शेंद्र्यात उद्योजकांनी घेतलेले अनेक प्लॉट पडून आहेत. मोठे प्लॉटस् घेतले, पण त्यावर उद्योग उभारले नाहीत. ते प्लॉट एमआयडीसीने ताब्यात घेऊन दुसऱ्याला द्यावेत. डीएमआयसीत देखील फक्त गुंतवणूक करण्यासाठी प्लॉट घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. भांडवल नसणाऱ्यांसाठी स्वतंत्र उद्योग झोन तयार करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.