प्रसूती रजेसाठी १५ दिवस वणवण
By admin | Published: January 19, 2016 03:50 AM2016-01-19T03:50:26+5:302016-01-19T03:50:26+5:30
महिला निवासी डॉक्टरांना प्रसूती रजा मिळावी, ही मार्डची मागणी दोन महिन्यांपूर्वीच राज्य सरकारने मान्य केली. मात्र, हा आदेश महापालिका रुग्णालयांपर्यंत पोहचवण्यास दिरंगाई
मुंबई : महिला निवासी डॉक्टरांना प्रसूती रजा मिळावी, ही मार्डची मागणी दोन महिन्यांपूर्वीच राज्य सरकारने मान्य केली. मात्र, हा आदेश महापालिका रुग्णालयांपर्यंत पोहचवण्यास दिरंगाई केल्याचा फटका दोन महिला निवासी डॉक्टरांना बसला आहे. गेल्या १५ दिवसांपासून सायन रुग्णालयातील दोन महिला निवासी डॉक्टरांना प्रसूतीरजा मिळवण्यासाठी विनवण्या कराव्या लागत आहेत.
सायन रुग्णालयातील मायक्रोबायोलॉजी विभागातील दोन महिला डॉक्टरांना प्रसूतीरजा हवी आहे. या रजेसाठी १५ दिवसांपूर्वी त्यांनी अर्ज केला आहे. तथापि, रुग्णालय प्रशासनाने अद्याप त्यांची रजा मंजूर न केलेली नाही. कारण, राज्य सरकारचे आदेशाचे पत्र सायन रुग्णालयापर्यंत अजूनपर्यंत पोहचलेले नाही. निवासी डॉक्टरांच्या धकाधकीच्या दिनचर्येमुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे या डॉक्टरांना टीबी होण्याचा धोका असतो. तसेच गर्भवती महिला निवासी डॉक्टरांनी असे काम केल्यास त्यांच्याबरोबरच त्यांच्या बाळावरही परिणाम होऊ शकतो. याचा विचार करूनच मार्डने टीबी झालेल्या निवासी डॉक्टरांना आणि महिला निवासी डॉक्टरांना प्रसूतीरजा द्यावी अशी मागणी केली होती. मार्डने केलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने या मागण्या मान्य केल्या.
टीबी झालेल्या रुग्णांना आणि महिला निवासी डॉक्टरांना भरपगारी रजा द्यावी असे पत्र २६ नोव्हेंबर २०१५ रोजी वैद्यकीय शिक्षण संशोधन आणि संचालनालयाने काढले. यात निवासी डॉक्टरांच्या एकूण शिक्षण कालावधीच्या २० टक्के रजा देण्याचे आदेश आहेत. त्यापेक्षा अधिक रजा लागल्यास संबंधित रुग्णालयांना अधिकार दिले आहेत.