केंबुर्ली होळीचा माळ येथे पाण्यासाठी वणवण
By Admin | Published: February 28, 2017 02:50 AM2017-02-28T02:50:18+5:302017-02-28T02:50:18+5:30
मुंबई-गोवा महामार्गालगत महाड तालुक्यातील केंबुर्ली गाव हद्दीतील होळीचा माळ या वाडीवर मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईची झळ बसली
सिकंदर अनवारे,
दासगाव- मुंबई-गोवा महामार्गालगत महाड तालुक्यातील केंबुर्ली गाव हद्दीतील होळीचा माळ या वाडीवर मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईची झळ बसली आहे. सध्या या वाडीला वहूर दासगाव नळपाणी पुरवठा योजनेच्या वाहिनीच्या व्हॉलवरून थेंब थेंब पाणी साठवण्यासाठी रात्र रात्रभर जागरण करावे लागत आहे. तर पाणी आणण्यासाठी वाडीतील महिलांना महामार्ग ओलांडून धोका पत्करून पाणी आणावे लागत आहे. नुकत्याच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊन निकालही जाहीर झाले. निवडणुकीपूर्वी पाणी देवू असे सर्वच राजकीय पक्षांनी आश्वासन दिले होते. सध्या या गावाला पाणी देणारा कोणीही वाली राहिलेला नाही, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
महाड तालुक्यातील केंबुर्ली गावाला नळपाणी पुरवठा योजना आहे. या गावामध्ये ही योजना काही प्रमाणात सुरू असली तरी याच गावातील महामार्गालगत असलेले होळीचा माळ या वाडीवर जवळपास ७०० ते ७५० लोकवस्ती आहे. या वाडीवर गेली अनेक वर्षे भीषण पाणीटंचाईची झळ बसत आहे. पावसाळ्यामध्ये देखील या गावामध्ये पाणीटंचाई असते. गावाशेजारी असलेल्या छोट्या मोठ्या ओढ्यांचा आधार असतो. मात्र पावसाळ्यानंतर याच पाण्याचा एकमेव आधार दासगाव वहूर नळपाणी पुरवठा योजनेच्या वाहिनीचा व्हॉल. या हद्दीत या योजनेचा व्हॉल आहे व तो नेहमी पाणी सुरू असल्यानंतर वाहत असतो. मात्र टंचाईवेळी या होळीच्या माळावर महिला रात्रंदिवस या ठिकाणाहून थेंबथेंब पाणी रात्रभर जागरण करीत रांगा लावत भरतात. काही दिवस दासगावची ही योजना ठप्प होती. यामुळे नागरिकांना उन्हातान्हात ३ ते ४ किमी अंतर पार करत विहिरीवरून पाणी आणावे लागले. संपूर्ण केंबुर्ली गावासाठी ही एकच विहीर आहे. महिलांना जीव मुठीत घेवून वाहनांची नजर चुकवत महामार्ग ओलांडून पाणी आणावे लागत आहे. राजकीय पुढारी असो, शासन असो सर्वांनीच या वाडीकडे दुर्लक्ष केले आहे. तरी शासनाकडून ही पाणी समस्या दूर करावी, अशी मागणी महिलांकडून करण्यात येत आहे.
वाडीकडे दुर्लक्ष का?
सध्या होळीच्या माळावरच्या महिलांना आपले कामधंदे सोडून दिवस-रात्र एक भांडे पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. शासनाकडून पाण्यावर कोट्यवधी रुपयांच्या योजना आखल्या जातात. पाणी माणसाचा एक महत्त्वाचा घटक आहे. मग शासनाकडून महाड तालुक्यातील महामार्गालगतच्या या वाडीकडे का दुर्लक्ष करत आहे, अशी खंत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
गावामध्ये लोकवर्गणीतून दोन बोअरवेल मारण्यात आल्या. परंतु या दोन्ही बोअरवेलला पाणी लागले नाही. निवडणूक आली की, राजकीय पुढारी आश्वासन देतात. मात्र निवडणूक संपल्यानंतर या वाडीकडे तसेच या पाण्याच्या समस्येकडे कोणीही लक्ष देत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. सध्या केंबुर्ली होळीचा माळ येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
गेली पाच वर्षे वाडीवर पाणीटंचाई आहे. या ठिकाणी जवळपास ७०० ते ७५० लोकसंख्या असून ३२५ मतदार आहेत. पाणीपट्टी बंद केली आहे. दासगाव योजनेचा व्हॉल हा आमचा पाण्याचा एकमेव आधार आहे. तो बंद झाल्यावर ४ किमी अंतरावरून विहिरीचे पाणी आणावे लागते. राजकीय पुढारी निवडणुकीपुरते आश्वासन देतात. मात्र पाण्याकडे कोणीही लक्ष देत नसून आम्हाला कोणी वालीच राहिलेला नाही.
- नथुराम मोरे, ग्रामस्थ केंबुर्ली, होळीचा माळ