शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना; कर्नाटकात ७ जणांना अटक, सेनेची राज्यभर निदर्शने, राष्ट्रवादीकडून दुग्धाभिषेक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 07:45 AM2021-12-20T07:45:29+5:302021-12-20T07:46:10+5:30

बंगळुरूनजीक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.

desecration of the statue of shivaji maharaj Seven arrested in Karnataka | शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना; कर्नाटकात ७ जणांना अटक, सेनेची राज्यभर निदर्शने, राष्ट्रवादीकडून दुग्धाभिषेक

शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना; कर्नाटकात ७ जणांना अटक, सेनेची राज्यभर निदर्शने, राष्ट्रवादीकडून दुग्धाभिषेक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

बंगळुरू / मुंबई : बंगळुरूनजीक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. बेळगावचा महाराष्ट्रात समावेश करावा या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागणीने संतप्त होऊन आम्ही छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना केली, असे या आरोपींनी पोलिसांना सांगितले. पुतळा विटंबनेचे राज्यात तीव्र पडसाद उमटले. घटनेच्या निषेधार्थ रविवारी शिवसेनेने ठिकठिकाणी निदर्शने करत कर्नाटक सरकार व भाजपविरोधात घोषणाबाजी केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभरात शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत कर्नाटकातील घटनेचा निषेध केला. 

लालबाग येथे शिवसेनेने केलेल्या निदर्शनात महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत यांच्यासह शिवसेनेचे विविध नेते सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध करतानाच मावळ्यांना त्रास द्याल तर पंतप्रधानांच्या खुर्चीपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला. 

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा देशाचा अपमान आहे. मनसे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कदापि सहन करणार नाही, असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी बेताल वक्तव्य करू नयेत. स्वतःवर नियंत्रण ठेवावे नाहीतर आम्हाला त्यांच्यावर नियंत्रण ठेवावे लागेल, असेही त्यांनी यावेळी म्हटले. मराठा क्रांती मोर्चा व शिवप्रेमी संघटनांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला. उभय संघटनांनी ठिकठिकाणी निदर्शने करत आरोपींवर तातडीने कारवाईची मागणी केली.

प्रवेशबंदीने व्यावसायिक, रुग्णांना फटका

पुतळा विटंबनेच्या वादामुळे महाराष्ट्र व कर्नाटकातील प्रवेशबंदी झाल्याने दोन्ही राज्यांतील विविध व्यावसायिक, शेतकरी व कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या रुग्णांची अडचण झाली आहे. रुग्णसंख्या घटल्याने मिरजेतील वैद्यकीय क्षेत्राला फटका बसत आहे. तसेच कर्नाटकातून येणाऱ्या गूळ, हळद, मिरची, गहू, मका, ज्वारी, सोयाबीन, भुईमूग व कडधान्याची आवक घटल्याने व्यावसायिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
 

Web Title: desecration of the statue of shivaji maharaj Seven arrested in Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.