‘उजाड’ कुसुंब्यात पडला ‘उजेड’, स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी पोहोचली गावात वीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 02:06 AM2017-09-06T02:06:23+5:302017-09-06T05:10:13+5:30
एकीकडे भारत महासत्ता बनण्याच्या गोष्टी होत असताना दुसरीकडे मात्र जळगाव शहरापासून फक्त दहा कि.मी. अंतरावर असलेल्या उजाड कुसंबा या गावात आतापर्यंत ‘अंधार’ होता.
हितेंद्र काळुंखे
जळगाव : एकीकडे भारत महासत्ता बनण्याच्या गोष्टी होत असताना दुसरीकडे मात्र जळगाव शहरापासून फक्त दहा कि.मी. अंतरावर असलेल्या उजाड कुसंबा या गावात आतापर्यंत ‘अंधार’ होता. देशाच्या स्वांतत्र्यानंतर तब्बल ७० वर्षांनी या गावात वीज पोहचली. उजाडलेलं म्हणून ओळखलं जाणाºया या गावात अखेर उजेड पडला. हा आनंद गावकºयांनी अक्षरश: दिवाळीसारखा साजरा केला.
या गावाची ही एक समस्या सुटली असली तरी अनेक समस्या अजूनही येथे घट्ट पाय रोवून आहेत. अशा या दुर्लक्षित गावाबाबत माहिती अशी की, अजिंठा महामार्गावर सर्वांना परिचित असलेले कुसुंबा हे गाव फार पूर्वी महामार्गापासून अडीच किमी दूर आतील भागात वसले होते. परंतु सोयीच्या दृष्टीने हे गाव आजच्या महामार्गालगत स्थलांतरीत झाले. यावेळी पाच- दहा घरे मात्र कायम तेथेच राहिली. मूळ गाव या ठिकाणाहून स्थलांतरीत झाल्याने गाव उजाड झाले. यामुळेच या पाच- दहा घरांच्या गावाला उजाड कुसुंबा म्हणून ओळखले जावू लागले. अशा उजाड ठिकाणीही हळूहळू वस्ती वाढत गेली. जागा मोफत पटकावता येत असल्याने मजूर विशेषत: भिल्ल, तडवी भिल्ल यांची वस्ती येथे वाढली. सध्या येथे पावणेदोनशे घरं (झोपड्या) आहेत.
धावला राधेश्याम आणि झाले विजेचे काम
कुसुंबा ग्रामपंचायत अंतर्गतच उजाड कुसुंबा हे गाव येते. कुसुंबा गावात राहणाºया ग्राम पंचायत सदस्या पल्लवी चौधरी यांचे पती राधेश्याम चौधरी हे रेमंड कंपनीत नोकरीस असून काही वर्षापासून कुसुंबा येथील ते रहिवासी झाले. उजाड कुसुंबाबद्दल त्यांना उत्सुकता होती म्हणूनच ते या गावात येवून फिरले. येथे आतापर्यंत वीज पुरवठा नसल्याचे पाहून त्यांना आश्चर्य वाटले आणि वीज आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यांचा हा वॉर्ड नसतानाही माणुसकीचे नाते जपत त्यांनी मोठ्या प्रयत्नांनी पदाधिकाºयांचे सहकार्य घेत येथे वीज खेचून आणली.
... आणि उभे झाले ७८ पोल
महामार्गापासून अडीच किमी अंतरावर या गावात वीज पोहचण्यासाठी ७९ पोल उभे करण्यात आले तर गावात १८ पोल उभे केले. एक डिपी देखील उभी राहीली. यादरम्यान हे काम करणाºया काही अधिकºयांची बदली झाली. यानंतर कार्यकारी अभियंता संजय तडवी, ग्रामीणचे उपकार्यकारी अभियंता एस. के. पाटील, अभियंता मयूर भंगाळे, संदीप गायकवाड, संकेत राऊत आदींनी पुढील कार्यवाही केली. ग्राम पंचायत पदाधिकारी व या अधिकाºयांच्या उपस्थितीत १५ आॅगस्ट २०१७ रोजी उद्घाटन समारंभ होवून गावात वीज आली.
... आणि झाला ढोल ताशांचा गजर
गावाच्या आजुबाजुच्या शेतांमध्ये वीज अनेक वर्षांपूर्वीच पोहचली होती मात्र गावात वीज नसल्याने गावकरी अनेक अडचणींना तोंड देत जीवन जगत होते. यामुळे वीज आल्यानंतर गावात ढोल- ताशांचा गजर करीत आनंद व्यक्त झाला. वीज आल्याचा आनंद सांगू शकत नाही, अशा प्रतिक्रिया गावक-यांनी व्यक्त केल्या.
या कामासाठी राधेश्याम चौधरीयांच्यासह सरपंच वत्सलाबाई कोळी, उपसरपंच आशाबाई साबळे, विलास कोळी, भावराव महाजन, प्रमीलाबाई पाटील, बेबाबाई तडवी, पल्लवी चौधरी तसेच ग्रामस्थ हर्षल राणे, नाना कोळी, शेरखा तडवी, मन्सूर तडवी, यासिन तडवी ग्रामविकास अधिकरी गजानन काळे आदींनी पाठपुराव्यासाठी परिश्रम घेतले.