माळघरला भीषण पाणीटंचाई
By Admin | Published: June 9, 2017 03:05 AM2017-06-09T03:05:27+5:302017-06-09T03:05:27+5:30
विहिरीला पाण्याचा थेंबही नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ माळघरकरांवर आली आहे.
हुसेन मेमन।
लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : या तालुक्यातील माळघर गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. विहिरीला पाण्याचा थेंबही नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ माळघरकरांवर आली आहे. या गावाजवळ एक बोअरिंग आहे. मात्र, तिच्यावर दिवसभरात ४० ते ५० हंडेच पाणी निघत असल्याने प्रत्येक कुटुंबाला दिवसाला दोनच हंडे पाणी ते ही आळीपाळीने भरावे लागत आहेत. येथील ग्रामस्थांनी पंधरा दिवसापूर्वी टँकरची मागणी करूनही पंचायत समितीकडून अद्याप तो पुरविला गेला नसल्याने गावातील महिला व ग्रामस्थांचे पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत.
तालुक्यापासून १८ कि.मी. अंतरावर असलेल्या माळघर गावात ५५ कुटुंबे राहत राहत असून परिसरातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. हे गांव डोंगरावर असल्याने या गावातील नागरिकांसाठी तीन ते चार किलोमीटर अंतराच्या परिसरात नदी, नाले असा कोणताही जलस्त्रोत नाही. त्यामुळे येथील नागरिकांवर पिण्याच्या पाण्यासाठी तडफडण्याची वेळ आली आहे.
या बोरिंगवर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांनी प्रत्येकाचे नंबर ठरवून घेतले आहेत. प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला दोनच हंडे पाणी मिळते. त्यामुळे नंबर लागण्यासाठी सात ते आठ तास वाट पहावी लागते. येथील ग्रामस्थांनी पंधरा दिवसांपूर्वी जव्हार पंचायत समितीकडे टँकरची मागणी करूनही अद्यापर्यंत टँकरने पाणी पुरवठा करण्यात आलेला नाही. या गावात माणसांना पिण्यासाठी पाणी मिळेनासे झाले आहे. तर तेथील जनावरांची हालत काय असेल? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.
बोअरिंगवर नंबर लावण्यासाठी येथील महिलांवर कधी रात्री तर कधी भल्या पहाटे जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महिलांमध्ये पाणी भरण्यासाठी भांडणे ही होतात.
>‘आमच्या गावाचे पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. आम्हाला रात्री बेरात्री पाण्यासाठी जंगलातील बोअरिंगवर जावे लागते. शासनाने लक्ष घालून टँकरची सोय करावी.
- संगीता कोंगील, गृहिंणी,
ग्रामस्थांनी पंधरा दिवसापूर्वी पंचायत समितीकडे पाण्यासाठी अर्ज केला आहे. मात्र,त्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. आमच्या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे पाऊस पडेपर्यंत टँकरने पाणी पुरवठा करावा अशी आमची मागणी आहे.
- गोविंद गावित, माजी सरपंच