वाळवंटीप्रश्नी वारकऱ्यांचे ‘वेट अॅण्ड वॉच’
By admin | Published: July 14, 2015 12:48 AM2015-07-14T00:48:54+5:302015-07-14T00:48:54+5:30
वाळवंटी राहुट्या उभारू द्याव्या, यासह आपल्या विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करणाऱ्या वारकऱ्यांनी सोमवारी सबुरीचे धोरण अवलंबले. येत्या बुधवारी
- बाळासाहेब बोचरे, सासवड
वाळवंटी राहुट्या उभारू द्याव्या, यासह आपल्या विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करणाऱ्या वारकऱ्यांनी सोमवारी सबुरीचे धोरण अवलंबले. येत्या बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत काय निर्णय होतो, याकडे त्यांचे लक्ष लागले आहे़ तर संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मंगळवारी जेजुरीत दाखल होणार आहे़
न्यायालयाचे आदेश असल्याचे सांगत सरकार वारकऱ्यांवर अनेक निर्बंध लादत आहे. तथापि, सरकारने मनात आणले तर काहीही होऊ शकते, असे वारकऱ्यांना वाटते़ २० दिवसांची पायी वारी आनंदमयी करायची की आंदोलनाला बसायचे, अशी द्विधा स्थिती वारकऱ्यांची असून पंढरपूरला जाईपर्यंत सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.
ज्ञानेश्वर महाराजांची पालखी शुक्रवारी संगमवाडी येथे विसाव्यास थांबलेली असताना वारकऱ्यांनी
ठिय्या आंदोलन केले होते. त्यामुळे पालखी रथाला तेथेच थांबावे
लागले. त्यावेळी दिशा ठरविण्यासाठी सासवड येथे दिंडी व बैठक
नियोजित केली होती़ परंतु सबुरीने घेण्याच्या निर्णयामुळे ही बैठक रद्द करण्यात आली़ तथापि, वाल्हे
किंवा लोणंद येथे याबाबत बैठक
होऊ शकते़
माऊली आज जेजुरीत
संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मंगळवारी सकाळी ६ वाजता सासवडला निरोप देणार असून रात्री मुक्कामाला जेजुरीला जाणार आहे़ तर, बुधवारी ही पालखी वाल्हे मुक्कामी असेल.
चालताना हरपते भान -भरणे
हॉलंडहून भारतात येऊन प्रथमच पायीवारीत दाखल झालेले गुरुनाथ आणि सीमा भरणे हे दाम्पत्य वारीच्या अनुभवाबद्दल बोलत होते़ हे दाम्पत्य मूळचे गोव्याचे असून ६२ वर्षीय गुरुनाथ भरणे हे केमिकल इंजिनिअर आहेत. टीव्हीवर पालखी सोहळा पाहायचो; पण आपल्याला या वयात चालणे जमेल की नाही, असेच वाटायचे. पंढरपूरला प्रथमच आलो असून पुणे ते सासवड या वाटचालीत कसलाही त्रास न झाल्याने पंढरपूरपर्यंतची वारी पूर्ण होईल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
पायीवारी म्हणजे आनंदाचा सुख सोहळा असून चालताना हरिनामात तल्लीन झाल्याने भान हरपते अन् पायात बळ संचारते़ रात्री मुक्कामी गेल्यावरच आपण किती चाललो हे कळते़
वारीत चालताना आपल्यापेक्षा वृद्ध लोक व अपंग लोकही वाटचाल करत होते़ हे पाहूनही पायात बळ संचारते, असेही ते म्हणाले.