देशाभिमान स्वदेशीतूनच
By admin | Published: July 24, 2016 02:55 AM2016-07-24T02:55:20+5:302016-07-24T02:55:20+5:30
लोकमान्य टिळकांनी समाजाला स्वराज्याचा महामंत्र, स्वातंत्र्यलढ्याला ऊर्जा आणि क्रांतिकारकांना प्रेरणा दिली. सर्वसामान्यांमधील पौरुष्य जागे केले. समाजाचे अभिसरण, एकत्रीकरण
पुणे : लोकमान्य टिळकांनी समाजाला स्वराज्याचा महामंत्र, स्वातंत्र्यलढ्याला ऊर्जा आणि क्रांतिकारकांना प्रेरणा दिली. सर्वसामान्यांमधील पौरुष्य जागे केले. समाजाचे अभिसरण, एकत्रीकरण करण्यासाठी व्यापक उपक्रम राबवले, स्वदेशीचा पुरस्कार केला. सध्याच्या काळात स्वदेशी अर्थात ‘मेक इन इंडिया’चा नारा देशासाठी उपयुक्त आहे. जगाच्या उत्पादनाची भूक भागवण्याची क्षमता भारताकडे आहे. त्यामुळे, लोकमान्य टिळकांचे ‘स्वदेशी’चे स्वप्न पूर्ण करून आपण जाज्वल्य देशाभिमान जागवला पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच’ या सिंहगर्जनेच्या शताब्दी वर्षास प्रारंभ झाला आहे. त्यानिमित्त लोकमान्य टिळक विचारमंच आणि पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे ‘टिळक इन अवर टाइम्स’ या पुस्तकाचे आणि लोकमान्य टिळकांवर आधारित फोटो बायोग्राफी इंग्रजी पुस्तकाचे तसेच ई-आवृत्तीचे प्रकाशन टिळक स्मारक मंदिर येथे फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर, नगरसेविका मुक्ता टिळक, किरण ठाकूर, विजय केळकर, आमदार माधुरी मिसाळ आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर चिरडण्यात आल्यानंतर समाजामध्ये कमालीचे नैराश्य निर्माण झाले होते. विजिगिषूू वृत्ती कमी झाली होती. समाजातील सर्व शक्तींना एकत्र करण्याचे काम त्यांनी केले. सध्याच्या काळात लोकमान्य टिळकांनी सांगितलेल्या स्वदेशीच्या सूत्राचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे. ‘मेक इन इंडिया’ ही संकल्पना लोकमान्यांच्या या सूत्राच्या हातात हात घालून जाणारी आहे. त्यामुळेच, संविधानास अनुरूप कार्य करून स्वराज्याकडून सुराज्याकडे जात लोकमान्यांचे स्वप्न आपण पूर्ण करायला हवे.’
माशेलकर म्हणाले, ‘स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या चतु:सूत्रीतून टिळकांनी समाजाला व्यापक विचारसरणी दिली. स्वराजाच्या सूत्रातून त्यांनी पूर्वीच्या काळी मेक इन इंडियाचा संदेश दिला. महाराष्ट्राने ‘मेक इन इंडिया’चे नेतृत्व करायला हवे. विज्ञान, तंत्रज्ञानाचा वापर करून तरुणांनी घाम गाळून, बुद्धीचा योग्य वापर करून प्रगती साधणे गरजेचे आहे. लोकमान्यांच्या स्पष्टवक्तेपणा, अन्यायाला विरोध, जिद्द, चिकाटी, स्वातंत्र्यप्रेम हे नव्या पिढीने आत्मसात केल्यास प्रगती होईल. (प्रतिनिधी)
आरपीआय कार्यकर्त्याची घोषणाबाजी
- मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यान आरपीआयच्या एका कार्यकर्त्याने व्यासपीठावर जाण्याचा प्रयत्न करत घोषणाबाजी केली. आपण पत्रकार असल्याचा बनाव करून तो मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी सभागृहात दाखल झाला. पोलिसांनी त्याला त्वरित ताब्यात घेतले. त्याला चौकशीसाठी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.