माजलगावाच्या आखाड्यात देशमुख-सोळंके यांच्यात दुरंगी लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 12:44 PM2019-07-29T12:44:19+5:302019-07-29T12:47:19+5:30
माजलगाव मतदारसंघात सद्या अनेकांना आमदार होण्याचे स्वप्न पडत असल्याने प्रत्येक पक्षात इच्छुकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीला अवघे तीन महिने शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात राजकीय वातावरण तापत असल्याचे पहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघात युती आणि आघाडीत इच्छुकांची गर्दी मोठ्याप्रमाणात पहायला मिळत असली तरीही, येथे भाजपचे विद्यामान आमदार आर.टी.देशमुख आणि राष्ट्रवादीकडून माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्यात दुरंगी लढत होणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. तर दोन्ही नेत्यांनी मतदारसंघात विविध कार्यक्रमातून कार्यकर्त्यांचा संपर्क वाढवला आहे.
माजलगाव मतदारसंघात सद्या अनेकांना आमदार होण्याचे स्वप्न पडत असल्याने प्रत्येक पक्षात इच्छुकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. युतीत हे मतदारसंघ भाजपकडे तर, आघाडीत राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे भाजप विरोधात राष्ट्रवादी असा सामना या मतदारसंघात रंगणार असल्याचे निश्चित झाले आहे. भाजपकडून विद्यामान आमदार आर.टी.देशमुख यांनी पुन्हा रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. मात्र असे असताना भाजपमधूनच रमेश आडसकर आणि मोहन जगताप हे सुद्धा इच्छुक आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून प्रकाश सोळंके यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे. त्यामुळे यावेळी माजलगावमध्ये खरी लढत देशमुख विरोधात सोळंके अशी होणार असल्याची चर्चा आहे.
२०१४ मध्ये माजलगावामध्ये राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके यांचा भाजपाचेआर.टी. देशमुख यांनी जवळपास ३७ हजार मताधिक्क्याने पराभव केला होता. विशेष म्हणजे गेल्यावेळी शिवसेना-भाजप वेगवेगळे लढले लढले होते. मात्र यावेळी युती निश्चित समजली जात आहे. त्यामुळे देशमुख यांचा पराभव करणे सोळंके यांच्यापुढे आव्हान असणार असल्याचे बोलले जात आहे.
विधानसभा २०१४
आर.टी.देशमुख ( भाजप ) - १ लाख १२ हजार ४९७
प्रकाश सोळुंके ( राष्ट्रवादी ) - ७२ हजार २५२
विधानसभा २००९
प्रकाश सोळुंके ( राष्ट्रवादी ) - ८६ हजार ९४३
आर.टी.देशमुख ( भाजप ) - ७९ हजार ३४