भूमाता ब्रिगेडच्या देसाईंना जीवे मारण्याची धमकी
By Admin | Published: February 13, 2016 01:41 AM2016-02-13T01:41:03+5:302016-02-13T01:41:03+5:30
भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून ‘तुमचाही दाभोलकर करू’ असे स्पष्टपणे पत्रामध्ये म्हटले आहे.
पुणे : भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून ‘तुमचाही दाभोलकर करू’ असे स्पष्टपणे पत्रामध्ये म्हटले आहे.
शनी शिंगणापूर येथील चौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्याच्या मागणीसाठी देसाई यांनी भूमाता ब्रिगेडच्या माध्यमातून आंदोलन उभे केले आहे. त्यांना मिळालेल्या धमकीमुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आपली कामगिरी खूप नावाजण्याजोगी आहे. तुम्ही हाती घेतलेले काम चांगले आहे. परंतु, शनी चौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्याची मागणी घेऊन सुरू केलेल्या आंदोलनामुळे सर्वसामान्यांना त्रास होत आहे, असे पत्रात म्हटले आहे. सरकारविरुद्ध लढत असाल तर अवश्य लढा. परंतु स्त्री पुरुष समानतेसाठी शिंगणापूरचीच निवड का, असा प्रश्नही पत्रात उपस्थित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी, बसचा पास नसल्यामुळे आत्महत्या केलेल्या मराठवाड्यातील मुलीसाठी, स्त्रीभ्रूण हत्येच्या विरोधासाठी ब्रिगेड का आंदोलन करीत नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
(प्रतिनिधी)
विचारांची लढाई विचारांनी लढली गेली पाहिजे. निनावी पत्राद्वारे धमक्या देण्यापेक्षा समोर येऊन अथवा नावानिशी धमकी द्यावी. आम्ही त्याचा सामना करु. धमक्यांना आम्ही घाबरत नाही. भूमाता ब्रिगेडकडून हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे. महिलांच्या हक्कांसाठी आम्ही लढत राहू. अहमदनगरमधून हे पत्र आलेले असून सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
- तृप्ती देसाई, भूमाता ब्रिगेड