विधान परिषद सभापतीपदी देशमुख
By admin | Published: May 9, 2014 01:28 AM2014-05-09T01:28:03+5:302014-05-09T01:28:03+5:30
विधान परिषदेच्या सभापतीपदी ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवाजीराव देशमुख यांची एकमताने निवड झाली. त्यांना सलग तिसर्यांदा हा मान मिळाला आहे.
मुंबई : विधान परिषदेच्या सभापतीपदी ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवाजीराव देशमुख यांची एकमताने निवड झाली. त्यांना सलग तिसर्यांदा हा मान मिळाला आहे. सभागृहाची उच्च परंपरा आणि सांसदीय मूल्यांची बूज राखून आपण कामकाज करू, असे देशमुख यांनी सांगितले. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी म्हणून ५० च्या दशकात काम केल्यानंतर पुढे दिवंगत लोकनेते वसंतदादा पाटील यांच्या प्रेरणेने राजकारणात उतरलेले देशमुख यांच्या कार्याचा, मनमिळाऊ आणि अजातशत्रू स्वभावाचा गौरव मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती वसंत डावखरे, विरोधी पक्षनेते विनोद तावडे, शिवसेनेचे गटनेते दिवाकर रावते, सांसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील, गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी केला. सभापतीपदाच्या निवडीसाठी विधान परिषदेचे एक दिवसाचे अधिवेशन गुरुवारी झाले. काँग्रेस पक्षाशी निष्ठावान राहत कष्टकरी अन् शेतकर्यांना न्याय देण्याचा आपण नेहमीच प्रयत्न केला. गेली पाच दशके जिल्हा परिषद सदस्य, मंत्री, सभापती आदी विविध पदांवर काम करताना विविध घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, अशी भावना देशमुख यांनी व्यक्त केली. हंगामी सभापती वसंत डावखरे यांनी देशमुख यांच्या निवडीची घोषणा केली. मुख्यमंत्री चव्हाण, अजित पवार, विनोद तावडे आणि हर्षवर्धन पाटील यांनी देशमुख यांना सभापतींच्या आसनापर्यंत नेले. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, जलसंपदामंत्री सुनील तटकरे आदींनीही त्यांचे अभिनंदन केले. (विशेष प्रतिनिधी)