देशमुखांच्या सांगण्यावरून पोलीस खात्यात रुजू; सचिन वाझेचा खळबळजनक जबाब
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 11:10 AM2021-11-25T11:10:42+5:302021-11-25T11:11:59+5:30
पालांडे यांचे वकील नितीन जगताप यांच्याकडून वाझेची उलट तपासणी करण्यात आली. यावेळी वाझेने, अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून पुन्हा सेवेत रुजू झाले असल्याचे सांगितले. मात्र विनंती पत्राशिवाय दुसरा कोणताही पुरावा आपल्याकडे नसल्याचे सांगितले.
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून पोलीस खात्यात पुन्हा येण्यासाठी अर्ज केल्याचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने चांदीवाल आयोगासमोर सांगितले. मात्र त्याबाबत पुरावे नसून फक्त विनंती अर्ज असल्याचेही जबाबात नमूद केले आहे. देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पालांडे यांच्या वकिलाकडून वाझेच्या केलेल्या उलट तपासणीदरम्यान ही माहिती समोर आली आहे.
पालांडे यांचे वकील नितीन जगताप यांच्याकडून वाझेची उलट तपासणी करण्यात आली. यावेळी वाझेने, अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून पुन्हा सेवेत रुजू झाले असल्याचे सांगितले. मात्र विनंती पत्राशिवाय दुसरा कोणताही पुरावा आपल्याकडे नसल्याचे सांगितले. तसेच सप्टेंबर २०२० ते डिसेंबर २०२० दरम्यान सीआययूमध्ये असताना कोणती प्रकरणे तपासासाठी देण्यात आली होती? तुम्ही परमबीर सिंग यांना याबद्दल माहिती दिली होती का? असे जगताप यांच्याकडून विचारताच, वैयक्तिकरीत्या कोणतीही प्रकरणे तपासासाठी देण्यात आलेली नव्हती, असे वाझेने सांगितले. तसेच परमबीर यांनी थेट काही मार्गदर्शन केलेले नाही. ते नियमानुसार योग्य चॅनेलद्वारे मार्गदर्शन करीत होते, असेही वाझेने यावेळी नमूद केले आहे.
लेटर बॉम्बबाबत काही आठवत नाही -
परमबीर यांच्या लेटर बॉम्बमध्ये ‘ज्ञानेश्वरी’ येथे झालेल्या पालांडे यांच्या भेटीदरम्यान पैशांबाबत चर्चा झाल्याचे नमूद होते. याबाबत बोलतानाही भेट झाली; मात्र भेटीचे पुरावे नाहीत. तसेच पैशांसंदर्भात काही चर्चा झाली नसल्याचेही वाझेने सांगितले आहे. परमबीर यांच्या लेटर बॉम्बमधील आरोपांबाबत काही आठवत नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानुसार त्यांचा जबाब नोंदवून चांदीवाल आयोग अधिक चौकशी करीत आहे.