देशमुख पिता-पुत्रांची काँग्रेसला सोडचिठ्ठी
By admin | Published: October 2, 2014 01:09 AM2014-10-02T01:09:51+5:302014-10-02T01:09:51+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख आणि त्यांचे पुत्र व पक्षाचे युवा नेते डॉ. अमोल देशमुख यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.
नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख आणि त्यांचे पुत्र व पक्षाचे युवा नेते डॉ. अमोल देशमुख यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.
देशमुख यांचे ज्येष्ठ पुत्र आशिष यांनी भाजपकडून काटोलमधून उमेदवारी दाखल केली आहे, तर त्यांचे दुसरे पुत्र डॉ. अमोल रामटेकमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. दोन पुत्र दोन वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक लढवीत असल्याने रणजित देशमुख यांच्यापुढे धर्मसंकट उभे ठाकले होते. त्यामुळे ते कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर बुधवारी त्यांनी त्यांच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना पाठविला आहे. प्रदेश काँग्रेसच्या निर्णयामुळे व भोंगळ कारभारामुळे आपल्याला प्रचंड मनस्ताप झाला असून, दोनवेळा प्रदेशाध्यक्षपद भूषविणाऱ्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याला ज्याप्रमाणे पक्षात वागणूक दिली जाते ती काँग्रेसच्या परंपरेला साजेशी नाही; त्यामुळे आपण राजीनामा देत आहोत, असे देशमुख यांनी प्रदेशाध्यक्षांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. अमोल देशमुख यांनीही पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे पाठविला आहे.
डॉ. अमोल देशमुख यांनी रामटेक येथून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. पण त्यांना नाकारण्यात आली होती, हे येथे उल्लेखनीय. (प्रतिनिधी)