बदल्यांसाठी आग्रही देशपांडे यांचीच आयोगातून बदली; दाेन आदेशांमुळे उडाली हाेती खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 06:47 AM2024-02-29T06:47:22+5:302024-02-29T06:47:32+5:30
एस. चोकलिंगम नवे राज्य निवडणूक अधिकारी नियुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्य व पोलिस प्रशासनाने बदल्या कराव्यात, असे आदेश काढणारे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचीच आयोगाने बुधवारी बदली केली. त्यांच्या जागी एस. चोकलिंगम यांची नियुक्ती केली आहे. श्रीकांत देशपांडे हे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत आणि ते येत्या एप्रिलमध्ये निवृत्त होणार आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशांचा हवाला देत देशपांडे यांनी अलीकडेच दोन आदेश काढले होते. निवडणुकीच्या कामाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या आहेत, त्याच जिल्ह्यात केल्या असतील, तर त्या रद्द कराव्यात आणि जिल्ह्याबाहेर बदल्या कराव्यात, असे आदेश देशपांडे यांनी काढले होते. पोलिस महासंचालक कार्यालयाने आयोगाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावून जिल्ह्यात बदल्या केल्या, ते योग्य नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. या बदल्या कायम ठेवाव्यात, ही पोलिस महासंचालक कार्यालयाची मागणी त्यांनी फेटाळली.
देशपांडे यांच्या दुसऱ्या आदेशाने आणखीच खळबळ माजली. महापालिका आयुुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापैकी ज्यांना तीन वर्षांचा कार्यकाळ एकाच ठिकाणी झाला असेल, त्यांचीही बदली करावी, असे आदेश देशपांडे यांनी काढले. ते मागे घ्यावेत, अशी विनंती राज्य सरकारने त्यांना केली. पण, ती त्यांनी फेटाळली. आयोगाच्या आदेशांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह काही अधिकाऱ्यांच्या बदल्या अटळ असल्याचे म्हटले जात होते. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने श्रीकांत देशपांडे यांचीच बुधवारी बदली केली.
निवडणूक आयोग व राज्य सरकार यांच्या संघर्षात देशपांडे यांची बदली झाल्याची चर्चा प्रशासनात आहे.
प्रामाणिक अधिकारी
राज्याचे नवे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम हे यशदा, पुणेचे महासंचालक आहेत. प्रशासनातील अत्यंत प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांचे नाव घेतले जाते.