पाणी पुरवठा, स्वच्छतेचे काटेकोर नियोजन करा, आषाढी यात्रा पूर्व तयारी बैठकीत पालकमंत्री देशमुख यांच्या सूचना
By admin | Published: June 7, 2017 06:33 PM2017-06-07T18:33:49+5:302017-06-07T18:33:49+5:30
-
पंढरपूर दि. ७ :- आषाढी यात्रेच्या कालावधीत पाणी पुरवठा, वीज व्यवस्था आणि स्वच्छतेचे नियोजन अतिशय व्यवस्थितरित्या होईल याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी बुधवारी येथे दिल्या.
पंढरपूर आषाढी यात्रेच्या तयारीबाबत आज पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. तुकाराम भवन येथे झालेल्या बैठकीस आमदार भारत भालके, पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू व्यासपीठावर उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी आषाढी यात्रेबाबत जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीबाबत माहिती दिली. त्यानंतर विविध पालखी सोहळा प्रमुख आणि संस्थान प्रमुखांच्या सूचना ऐकून घेण्यात आल्या. त्यासूचनाबाबत पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले की, पालखी सोहळा प्रमुख आणि दिंडी प्रमुख यांच्याकडून आलेल्या सूचनांवर संबंधित विभागाकडून कार्यवाही करण्यात येईल. वारकरी आणि भाविक यांना जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील,अनुषंगाने वारीचे नियोजन केले जाईल.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या बरोबर जिल्ह्यात येणाऱ्या विविध संतांच्या पालखी आणि दिंडींना योग्य तो पालीस बंदोबस्त पुरवला जाईल. त्यांच्या सोलापूर जिल्ह्यातील रिंगण आणि सोहळा मुक्काम ठिकाणी आवश्यक पायाभूत सुविधा पुरविल्या जातील, असे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सांगितले.
आषाढी यात्रा कालावधीत आणि पालखी तळाच्या ठिकाणी पुरेसा पाणी पुरवठा केला जाईल याची काळजी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने घ्यावी. त्याचबरोबर पालखी मुक्काम तळावर वीज व्यवस्था राहील याची दक्षता महावितरण कंपनीकडून घेतली जाईल, असेही पालकमंत्री विजय देशमुख यांनी सांगितले.
सोलापर जिल्ह्यात सर्व पालख्यांचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्वागत केले जाईल. पंढरपूर शहरातील आणि वाखरी परिसरातील अतिक्रमणे काढून टाकली जातील. यात्रा कालावधीत चंद्रभागा नदी वाहती ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाबरोबर चर्चा करुन त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. त्याचबरोबर अकलूज येथील सदाशिव माने विद्यालयाच्या मैदानावर मुक्काम असणा?्या दिंडींची अन्यत्र सुयोग्य व्यवस्था केली जाईल, असे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितले. यात्रा कालावधीत यात्रा कर, सद्याचा पार्किग कर असा कोणत्याही प्रकारचा कर आकारला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पालखी आगमन आणि यात्रा कालावधीत पोलीस बंदोबस्त नेटकेपणाने ठेवला जाईल . वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी नियोजन केले जाईल, असे पोलीस अधिक्षक एस. वीरेश प्रभू यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्यावतीने पाणी पुरवठा, आरोग्य आणि स्वच्छता याबाबत नियोजन केले आहे. आवश्यक ते मुनष्यबळ पुरवले जाईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड यांनी सांगितले.
यावेळी संत तुकाराम महाराज संस्थानचे अभिजीत मोरे, निवृत्ती महाराज संस्थानचे संजयनाना घोंगडे, संत सोपानकाका महाराज संस्थानचे गोपाळकाका गोसावी, जळगावकर महाराज, भागवत चौरे यांनी विविध सूचना मांडल्या. बैठकीस सार्वजनिक आरोग्य, महसूल, पोलीस, राज्य उत्पादन शुल्क, अन्न औषध प्रशासन, जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
----------------------------
- पाणी पुरवठा, स्वच्छतेला प्राधान्य
- यात्रा कालावधीत चंदभागेत वाहते पाणी राहणार
- कोणताही कर आकारला जाणार नाही.
- प्रमुख पालख्यांचे प्रशासनामार्फत स्वागत करणार
- वाहतूक नियोजनासाठी जास्तीचे पोलीस मागवणार