अध्यक्ष होऊनही शनीचौथरा वर्ज्यच!
By admin | Published: January 12, 2016 01:58 AM2016-01-12T01:58:20+5:302016-01-12T01:58:20+5:30
शनिशिंगणापूर देवस्थानच्या अध्यक्षपदी अनिता चंद्रहास शेटे यांची सोमवारी निवड झाल्याने गेल्या अनेक वर्षांची परंपरा मोडीत निघाली आहे. तथापि, महिला अध्यक्ष झाली
सोनई (अहमदनगर) : शनिशिंगणापूर देवस्थानच्या अध्यक्षपदी अनिता चंद्रहास शेटे यांची सोमवारी निवड झाल्याने गेल्या अनेक वर्षांची परंपरा मोडीत निघाली आहे. तथापि, महिला अध्यक्ष झाली, तरी, शनिचा चौथरा महिलांसाठी वर्ज्यच राहणार आहे. आम्ही प्रथा व परंपरांचे काटेकोरपणे पालन करणार असून महिलांना चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाचे दर्शन घेता येणार नाही, असे खुद्द नूतन अध्यक्षांनीच स्पष्ट केले आहे.
आदिनाथ शेटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देवस्थानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि अन्य पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. या बैठकीनंतर विधान परिषदेचे आमदार अरुण जगताप यांच्या हस्ते नवनियुक्त अध्यक्ष अनिता शेटे यांचा सन्मान करण्यात आला.
येथील चौथऱ्यावर शनिदेवाची मूर्ती नसून स्वयंभू शिळा आहे़ त्यामुळे कुणालाही चौथऱ्यावर प्रवेश दिला जात नाही़ या नियमांचे पालन होणे गरजेचेच असल्याचे सांगत महिला भाविकांचे प्रश्न आणि देवस्थान विकासासाठी काम करणार असल्याचे शेटे यांनी सांगितले. (वार्ताहर)
परवानगीचा कायदा...
शनीचौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा, अशी मागणी सध्या होत आहे. सर्वच धर्मातील महिलांना त्यांच्या प्रार्थनास्थळावर जाऊ देण्याची परवानगी देण्याचा कायदा करायला हवा. नवीन विश्वस्त मंडळींनी यासाठी प्रयत्न करावा,
असे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी सांगितले.