मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिष्टाईनंतरही शिवतारे बारामती लढविण्यावर ठाम, १२ एप्रिल राेजी भरणार उमेदवारी अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 10:04 AM2024-03-25T10:04:27+5:302024-03-25T10:04:58+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समूजत काढल्यानंतरही रविवारी शिवतारे यांनी निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले.
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात भूमिका घेत बारामतीतून लोकसभा लढविण्याचा निर्णय माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी कायम ठेवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समूजत काढल्यानंतरही रविवारी शिवतारे यांनी निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले. १२ एप्रिल रोजी १२ वाजता अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची भूमिका त्यांनी जाहीर केली.
बारामतीत अजित पवाररूपी हुकूमशाही संपवण्यासाठी माझे धर्मयुद्ध आहे, असे त्यांनी जाहीर केल्याने महायुतीमधील वाद उफाळण्याची चिन्हे आहेत.
महायुतीमध्ये बारामतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी लोकसभेसाठी मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच शिवतारे यांनी भूमिका जाहीर केल्याने अजित पवारांच्या अडचणी वाढल्या आहेत. शिवतारे म्हणाले, अजित पवारांविरोधात आपली लढाई आहे. राष्ट्रवादीकडून गैरसमज पसरवले जात असून मी शरद पवार यांचा माणूस असल्याचे सांगितले जात आहे. मात्र मला केवळ अजित पवार यांचा पराभव करायचा आहे.
‘शरद पवारांनी ग्रामीण दहशतवाद पसरवला’
ग्रामीण दहशतवाद शरद पवारांनी केला. माझ्या माणसांना त्रास दिला जात आहे. अख्ख्या राज्याला ग्रामीण दहशतवाद शब्द माहीती पडेल. ईस्ट इंडिया कंपनी गेली आणि पवारांची कंपनी आली. अजित पवार आणि शरद पवार एक राक्षस आणि दुसरा ब्रह्मराक्षस असून दोघांचा खात्मा करायचा आहे, असे शिवतारे म्हणाले.
युती धर्म पाळावाच लागेल : संजय शिरसाट
पक्षात असाल तर महायुतीचा धर्म पाळावाच लागेल. ज्यांना हा धर्म पाळायचा नसेल त्यांनी त्यांचे मार्ग वेगळे निवडावेत. त्यांना आमचा पाठिंबा नसणार आहे. कोणत्याही उमेदवाराला आपण थांबवू शकत नाही.
पण जर एखादा उमेदवार पक्षाच्या चौकटीत काम करत असेल तर त्याला पक्षाचे आदेश मानावे लागतील. पण जर एखाद्याने पक्ष सोडला असेल तर तो स्वतंत्र आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी दिली.