नऊ आमदार असतानाही दि. बा. पाटील झाले होते विरोधी पक्षनेते; विधानसभेत यंदा विरोधी पक्षनेतेपद मिळणार का? यावरून तर्कवितर्क सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 08:48 AM2024-12-11T08:48:33+5:302024-12-11T08:48:52+5:30
विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद मिळण्यासाठी कोणत्याही पक्षाचे महाराष्ट्रात किमान २८ आमदार असायला हवेत, असा नियम असल्याने यावेळी विरोधी पक्षनेताच नसेल, असे म्हटले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद मिळण्यासाठी कोणत्याही पक्षाचे महाराष्ट्रात किमान २८ आमदार असायला हवेत, असा नियम असल्याने यावेळी विरोधी पक्षनेताच नसेल, असे म्हटले जात आहे. अशात शेकापचे केवळ नऊ आमदार असतानाही ज्येष्ठ नेते दि. बा. पाटील यांना विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले होते, ही बाब समोर आली आहे. मविआत काँग्रेस, उद्धवसेना वा शरद पवार गट यापैकी यंदा कोणालाही २८ जागा मिळालेल्या नाहीत.
विधानसभेत २० किंवा त्याहून कमी आमदार, तरीही झालेले विरोधी पक्षनेते
कालावधी एकूण नाव पक्ष पक्षाचे एकूण दिवस आमदार
१) १९६२ ते १९६७ २१९० कृष्णराव नारायणराव धुळप (शेकाप) १५
२) १९६७ ते १९७२ २१९१ कृष्णराव नारायणराव धुळप (शेकाप) १९
३) ०७ एप्रिल १९७२ ते जुलै १९७७ १९४१ दिनकर बाळू पाटील (शेकाप) ७
४) १८ जुलै १९७७ ते फेब्रुवारी १९७८ २२५ गणपतराव अण्णासाहेब देशमुख (शेकाप) १३
५) १७ डिसेंबर १९८१ ते २४ डिसेंबर १९८२ ३७३ बबनराव दादाबा ढाकणे (जनता पार्टी) १७
६) २४ डिसेंबर १९८२ ते १४ डिसेंबर १९८३ ३५६ दिनकर बाळू पाटील (शेकाप) ९
७) १४ डिसेंबर १९८६ ते २६ नोव्हेंबर १९८७ ३४७ निहाल अहमद (जनता पार्टी) १७
८) २७ नोव्हेंबर १९८७ ते २२ डिसेंबर १९८८ ३९१ ॲड. दत्ता नारायण पाटील (शेकाप) १३
९) २३ डिसेंबर १९८८ ते १९ ऑक्टोबर १९८९ ३०० मृणाल केशव गोरे (जनता पार्टी) २०
१०) २० ऑक्टोबर १९८९ ते ३ मार्च १९९० १३५ ॲड. दत्ता नारायण पाटील (शेकाप) १३
न्यायालयाचे निर्णय अन् ‘मावळणकर रुल’
विधानमंडळाचे दीर्घ काळ सचिव राहिलेले अनंत कळसे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, लोकसभेचे पहिले अध्यक्ष गणेश वासुदेव मावळणकर यांनी विरोधी पक्षनेतेपदाबाबत रुलिंग दिलेले होते. त्याला ‘मावळणकर रुल’ असे म्हणतात. त्यांनी असे निर्देश दिले होते की, सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या एक दशांश इतकी संख्या विरोधी पक्षनेतेपदासाठी असावयास हवी. याच मावळणकर रुलचा आधार घेत २०१४ ते २०२४ पर्यंत काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद नाकारण्यात आले होते. विरोधी पक्षनेतेपद मिळण्यासाठी विशिष्ट आमदार/खासदार संख्या असलीच पाहिजे, असे न्यायालयाचे निकालही आहेत.
नियम कुठे आहे दाखवा? उद्धवसेनेचे आव्हान
उद्धवसेनेचे आमदार भास्कर जाधव ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, की महाराष्ट्र विधिमंडळाचे कामकाज ज्या नियमांनुसार चालते त्यात विरोधी पक्षनेतेपदासाठीचे काहीही निकष नाहीत. हा २८ चा आकडा कोणी आणि कुठून आणला? नियमात तसे काहीच नाही. तरीही कोणी दावा करत असतील तर त्यांनी नियम दाखवावा.