निरक्षर असूनही ‘ति’ने केले देहदान
By Admin | Published: April 4, 2016 01:29 AM2016-04-04T01:29:37+5:302016-04-04T01:29:37+5:30
देहदानाविषयी सर्वत्र उदासीनता असताना भोसे (ता. खेड) येथील एका अशिक्षित वृद्ध महिलेने देहदानाचा निर्णय घेऊन सुशिक्षितांपुढे आदर्श निर्माण केला आहे. अक्षरओळख नाही की लिहिता, वाचता येत नाही.
काळूस : देहदानाविषयी सर्वत्र उदासीनता असताना भोसे (ता. खेड) येथील एका अशिक्षित वृद्ध महिलेने देहदानाचा निर्णय घेऊन सुशिक्षितांपुढे आदर्श निर्माण केला आहे. अक्षरओळख नाही की लिहिता, वाचता येत नाही. मात्र राज्यातील घडामोडीची माहिती व्हावी, यासाठी दूरदर्शनवरील मनोरंजनाचे कार्यक्रम न पाहता बातमी ऐकण्याची गोडी असलेल्या वयाची ६० पार केलेल्या सिंधुबाई वसंतराव लोणारी असे या आदर्श महिलेचे नाव आहे.
सत्तासंपत्तीसाठी एकमेकांचा जीव घेणाऱ्यांचा माझ्या देहाला त्यांचा स्पर्शही नकोय. मृत्यूनंतर धार्मिक विधी हे थोतांड करण्यापेक्षा गोरगरीब समाजाच्या झोळीत दान टाका. दुर्लक्षित समाजाला मदत करा, असे कुटुंबीयांना सांगितले असल्याचे सिंधुबाई वसंतराव लोणारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
सिंधुबाई लोणारी या शेती साभांळून भाजीपाल्याची पाटी डोक्यावर घेऊन भाजी विक्री करण्याचा व्यवसाय करतात. लिहिता-वाचता येत नसले तरीही दूरदर्शनवरील बातम्या ऐकण्याची गोडी त्यांना अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे कुठे काय घडले आणि राजकारणाची उलथापालथ या राजकीय घडामोडीविषयी आवर्जून बोलतात. सत्ता-संपत्ती इस्टेटीसाठी बहिणींची फसवणूक करणारे भाऊ असो की सासरकडील लोक असो, मृत्यूनंतर माझ्या देहाचे शवविच्छेदन करून वैद्यकीय क्षेत्राचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल, या उद्देशाने शरीररचनाशास्त्र विभाग वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांच्याकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता करून देहदान केले असल्याचे सिंधुबाई लोणारी यांनी सांगितले. (वार्ताहर)