आघाडीने खर्च करूनही सिंचन शून्य
By admin | Published: April 18, 2016 01:28 AM2016-04-18T01:28:33+5:302016-04-18T01:28:33+5:30
गेल्या १५ वर्षांपासून काँग्रेस आघाडी सरकार व तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांनी सिंचनासाठी तब्बल सत्तर हजार कोटी रुपये अक्षरश: उधळले. मात्र त्यामुळे सिंचनाखालील क्षेत्रात शून्य टक्के वाढ झाली
जळगाव : गेल्या १५ वर्षांपासून काँग्रेस आघाडी सरकार व तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांनी सिंचनासाठी तब्बल सत्तर हजार कोटी रुपये अक्षरश: उधळले. मात्र त्यामुळे सिंचनाखालील क्षेत्रात शून्य टक्के वाढ झाली, असा पलटवार जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर केला.
राज्यात दीड वर्षांत एक टक्काही सिंचन झाले नसल्याची टीका पवार यांनी महाजन यांच्या उपस्थितीत शनिवारी येथील राष्ट्रीय डाळिंब परिषदेच्या उद्घाटन समारंभात केली होती. महाजन यांनी रविवारी जामनेरमध्ये पत्रकार परिषदेत पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. तसेच युती सरकार सिंचनासाठी कोणत्या योजना अंमलात आणत आहे, याची जंत्रीच तपशीलवारपणे मांडली.
आघाडी शासनातील तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांनी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तब्बल ९० हजार कोटींचे कर्ज काढले. मात्र त्यातून त्यांनी किती व कोणते प्रकल्प पूर्ण केले व किती क्षेत्र सिंचनाखाली आले, याचा अद्यापही ताळमेळ लागत नसल्याचे ते म्हणाले.
जलसंपदा खात्याने ९७ कामांना मंजुरी देऊन त्यातील २८ प्रकल्प पूर्ण केले. गेल्या वर्षभरातच सुमारे ५० हजार कोटी रुपयांच्या कामांना मान्यता दिली. त्याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे, त्यामुळे पवार यांना सिंचनावर टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याचे महाजन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)