टोल माफी असतानाही प्रवाशांच्या खिशाला कात्री; कोकणात जाताना प्रवास विघ्ने
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 05:53 AM2023-09-18T05:53:56+5:302023-09-18T05:54:40+5:30
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर डाव्या बाजूची एक मार्गिका टोलमाफी पास असलेल्यांसाठी ठेवण्यात आली होती
मुंबई - गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता; परंतु टोलमाफी असतानाही गणेशभक्तांच्या वाहनांवरील फास्टॅगमधून परस्पर टोलची रक्कम कापली गेली; त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर डाव्या बाजूची एक मार्गिका टोलमाफी पास असलेल्यांसाठी ठेवण्यात आली होती. त्यामुळे पास असून फास्टॅगमधून पैसे कापले जात असल्याचे अनेकांनी सांगितले. टोल माफी ही एक राजकीय घोषणा होती. कसलेही नियोजन नाही. त्यामुळे ज्यांच्या कारवर फास्टॅग त्यांचे पैसे कट होणारच. हीच सवलत द्यायची तर टोलनाक्यावर तशा सूचना हव्यात ते न केल्याने हा प्रकार घडत असल्याचे एका वाहनचालकाने सांगितले.
गणेशभक्त अडकले वाहतूककोंडीत
लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी आसुसलेल्या कोकणवासीयांनी गावाकडे जायची एसटी - रेल्वे धरली खरी, पण वाटेत अनेक विघ्न आल्याने गावी पोहोचण्यासाठी १८ ते २४ तास लागत आहेत.
शनिवारी रात्री आठ वाजता निघालेले प्रवासी रविवारी सायंकाळ चारपर्यंत संगमेश्वरापर्यंतच पोहोचले होते. गेली १७ वर्षे मुंबई - गोवा हायवेचे काम रखडले असल्याने चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. - यशवंत जड्यार, सचिव, वसई - सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना
ठाणे स्थानकात फलाट क्रमांक पाच आणि सहावर छप्पर नसल्याने प्रवाशांना भर पावसात गाडीची वाट पाहावी लागली. गेल्या वर्षभरापासून ही स्थिती आहे. - नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघ
एखाद्या गाडीवर काही दंड असल्यास तो आधी तपासला जातो आणि मग टोलमाफीचा पास देतात. पास आणायला जाण्यापूर्वी वाहनचालकांनी दंड आहे की नाही तो बघून घ्यावा. - अभिषेक साळवी, प्रवासी