उद्ध्वस्त शेत अन् हताश शेतकरी

By Admin | Published: March 15, 2015 01:15 AM2015-03-15T01:15:34+5:302015-03-15T01:15:34+5:30

राज्यात गेल्या काही दिवसांपासून गारपीट आणि अवकाळी पावसाने पुन्हा जोर धरल्याने रब्बी हंगामातील सोंगणीलायक पिके अक्षरश: आडवी झाली

Destroying farm and desperate farmer | उद्ध्वस्त शेत अन् हताश शेतकरी

उद्ध्वस्त शेत अन् हताश शेतकरी

googlenewsNext

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून गारपीट आणि अवकाळी पावसाने पुन्हा जोर धरल्याने रब्बी हंगामातील सोंगणीलायक पिके अक्षरश: आडवी झाली असून डोळ््यांदेखत उद्धस्त झालेले शेत हताशपणे पाहण्याची वेळ बळीराजावर आली आहे. गारपीट थांबण्याचे नाव घेत नसल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
नाशिक शहर व जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्री व शनिवारी पाऊस व गारपिटीमुळे द्राक्ष, गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात वीज कोसळून सहा जनावरेही दगावली आहेत.
पश्चिम विदर्भातही नुकसान
पश्चिम विदर्भात गहू, हरभरा भाजीपाला, फळपिके असे जवळपास ७५ हजार हेक्टर बाधित झाले आहे. शुक्रवारी रात्री अकोला जिल्ह्यात वादळी पाऊस झाला.
पश्चिम विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी मान्सूनचा पाऊस झाल्याने खरीप पिकांचे उत्पादन घटले होते. रब्बी पिकावर आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांना आता गारपिटीने सतावले आहे. यवतमाळमध्ये १७,४४६, अमरावतीत ७ हजार, अकोल्यात १,८३० हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. अवकाळी पावसाने पश्चिम विदर्भातील गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. पण पाऊस सुरू च असल्याने नुकसानीचे आकडे बदलत असल्याचे अमरावतीचे विभागीय कृषी सहसंचालक एस.आर. सरदार यांनी सांगितले.
नगरला बागा आडव्या
अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर भागात मागील आठ-दहा दिवसांत सहा तालुक्यातील शंभर गावांना पावसाचा तडाखा बसला आहे. जिल्ह्यात गहू, हरभरा, कांदा या पिकांसह डाळींब, द्राक्ष आणि चिकूच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरू झाले असून पुढील आठवड्यात अहवाल हाती येईल, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे यांनी सांगितले. शुक्रवारी रात्री वीज पडून पारनेर तालुक्यात पाच शेळ्या व तीन करडे ठार झाली.
सांगलीत द्राक्षबागांवर संकट
सांगली जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने द्राक्षबागांसह रब्बी पिके आडवी झाली. खानापूर तालुक्यात गारपीट झाल्याने द्राक्षबागायतदारांना जबर फटका बसला. सध्या तालुक्यातील ३५ ते ४० टक्के द्राक्षे बाजारपेठेत आली आहेत. उर्वरित ६० टक्के द्राक्ष माल अजूनही शेतात आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

च्पुणे : गेल्या १५ दिवसांपासून राज्यात धुमाकूळ घालणारा अवकाळी पाऊस आणि गारपीट पुढील दोन दिवसानंतर सरणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. १५, १६ मार्चला पावसाची शक्यता असून १७ मार्चपासून पाऊस गायब होईल आणि आकाश निरभ्र राहील, असा अंदाजही हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
खान्देशात हजेरी
च्नंदुरबारमधील तळोदा तालुक्यात गारा पडल्या. धुळे येथेही रात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. खान्देशात आतापर्यंत दोन वेळा पंचनामे झाले आहे. परंतु शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचे पंचनामे अजून झालेले नाहीत, तोच पुन्हा पाऊस कोसळत आहे.

युरोपातील द्राक्षनिर्यात ५०० कोटींनी घटणार
नाशिक : आॅक्टोेबरपासून अधूनमधून होत असलेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीला फटका बसला असून, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्ष निर्यात निम्म्याने घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मागील वर्षी युरोपात ९७५ कोटींची द्राक्ष निर्यात झाली होती. यंदा गारपिटीमुळे सुमारे ४५० कोटींच्या आसपास राहणार असल्याने त्यात ५०० कोटींची घट होईल, असे चित्र आहे. मागील वर्षी मुंबई पोर्ट ट्रस्टमधून १० हजार कंटेनरची द्राक्ष निर्यात होऊन त्यापोटी सुमारे १,६०० कोटींचे परकीय चलन मिळाले होते.

पुढील १० ते १२ दिवसांत निर्यात २ हजार ५०० कंटेनरच्या घरात जाईल. मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास ३,५०० कंटेनर निर्यात कमी होईल, असे दिसते. एका कंटेनरमध्ये साधारणपणे १५ मेट्रीक टन द्राक्ष असतात.
- अशोक गायकवाड, अध्यक्ष,
महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ
निर्यातक्षम द्राक्षांबाबत काही निकष आहेत. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्षाच्या गुणवत्तेत व दर्जातही काही प्रमाणात फरक पडू शकतो. तसेच स्थानिक बाजारपेठेतही व्यापाऱ्यांकडून पडते भाव मिळू शकतात.
- ज्ञानेश्वर बोराडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी

 

Web Title: Destroying farm and desperate farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.