नाशिकमध्ये गावठी बॉम्ब निकामी
By Admin | Published: February 26, 2015 02:11 AM2015-02-26T02:11:25+5:302015-02-26T02:11:25+5:30
महापालिकेच्या मुख्यालयापासून अवघ्या काही मीटरवरील एका बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयासमोर सापडलेला जिवंत गावठी बॉम्ब बॉम्बशोधक
नाशिक : महापालिकेच्या मुख्यालयापासून अवघ्या काही मीटरवरील एका बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयासमोर सापडलेला जिवंत गावठी बॉम्ब बॉम्बशोधक व नाशक पथकाने दुपारी तातडीने निकामी केला. घटनेमागे बांधकाम व्यावसायिकाला घातपात घडविण्याचा उद्देश असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पेट्रोलच्या बाटलीत कंडेन्सर लावून त्याला टायमर जोडून गावठी बॉम्ब तयार करण्यात आला होता. सुयोजित हाइट्स इमारतीमध्ये बांधकाम व्यावसायिक अनंत राजेगावकर यांचे मुख्य कार्यालय आहे. कार्यालयात आणून दिलेल्या कुरिअरमधील खोक्यात पेट्रोलची दुर्गंधी येत असल्याने कर्मचाऱ्यांनी ते खोके इमारतीच्या मोकळ्या जागेत आणून ठेवले आणि तेथून नाट्याला सुरुवात झाली. दुपारी दीड वाजताच्या सुमारास हे बॉम्बसदृश्य वस्तू असलेले बेवारस खोके लोकांना दिसले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने परिसर निर्मनुष्य केला व बॉम्बशोधक पथकाला पाचारण केले. त्यानंतर तब्बल दोन तासांच्या प्रयत्नांनंतर गावठी बॉम्ब निकामी करण्यात आला.
दुपारी एका अनोळखी व्यक्तीने राजेगावकर यांच्या कार्यालयात कुरिअर आणून दिले. कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असल्याचे निदर्शनास येताच संबंधित इसमाने घाईगर्दीतच खिशातून रुमाल काढून तोंडाला गुंडाळला व ‘सदरचा खोका राजेगावकर यांनाच उघडायला सांग’ असे कर्मचाऱ्यांना दरडावले आणि तो निघून गेला. त्यानंतर काही वेळाने कार्यालयातील दूरध्वनीवरून अज्ञात इसमाने संबंधित कुरिअरबाबत विचारणा केली व ‘राजेगावकर यांनाच ते उघडायला लावा’ अशी सूचना केली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना संशय आला. एका कर्मचाऱ्याने खोके उघडले असता, त्यात पेट्रोलची दुर्गंधी आल्याने त्याने हे खोके मोकळ्या जागेत ठेवले होते. यामागे व्यावसायिकाला धमकावण्याचाच हेतू असण्याची शक्यता पोलिसांना वाटत आहे. (प्रतिनिधी)