“धनगर समाजाने तुमचे काय घोडे मारले?”; ठाकरे सरकारला संतप्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 09:23 AM2022-05-12T09:23:33+5:302022-05-12T09:36:34+5:30
फक्त धनगर समाजाच्या मतांवर डोळा ठेवायचा, नंतर वापरा आणि फेका ही निती सर्वच राजकीय पक्षांची आहे असा आरोप ऑल इंडिया धनगर समाज महासंघाने केला आहे.
मुंबई – मागील मंत्रिमंडळ बैठकीत सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं विविध महामंडळांना भरीव निधी देण्याचा ठराव करण्यात आला. मात्र मराठा समाजापाठोपाठ दोन नंबरवर असणाऱ्या धनगर समाजाला काय निधी दिला. मेंढपाळांसाठी असणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी-मेंढी विकास महामंडळाला कसलाही निधी दिला नाही. महाविकास आघाडी सरकार धनगर समाजाला निधीपासून वंचित का ठेवते. मविआ सरकार आल्यापासून धनगर समाजाला किती आणि काय सुविधा दिल्या याचा तपशील द्यावा अशी मागणी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रविण काकडे यांनी केली आहे.
प्रविण काकडे यांनी पत्रक जारी करत म्हटलंय की, धनगर समाजाची एसटी आरक्षणाची मागणी सर्वच राजकीय पक्षांनी कायमस्वरुपी बाजूला ठेवली. धनगर समाजाने तुमचे काय घोडे मारले. सातत्याने धनगर समाजावर अन्याय करत आहात. मेंढपाळांवर दररोज अन्याय सुरू असून त्याची दखल घेतली जात नाही. डोंगर भागात राहणाऱ्या धनगरांना वनविभागाच्या त्रासाला तोंड द्यावे लागते. फक्त धनगर समाजाच्या मतांवर डोळा ठेवायचा, नंतर वापरा आणि फेका ही निती सर्वच राजकीय पक्षांची आहे असा आरोप त्यांनी केला.
त्यामुळे धनगर समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा. धनगर समाजाच्या मतांवर निवडून आलेल्या लोकप्रतिधिनींनी समाजाच्या मागण्या मान्य होण्यासाठी प्रयत्न करावेत. धनगर समाजाच्या एकाही प्रश्नाकडे सरकार लक्ष देत नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीचा कोणताही निर्णय घेतला नाही. धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, मेंढपाळांचे प्रश्न, आजही अनेक धनगर वस्त्या मुलभूत सुविधांपासून वंचित असल्याचा आरोप करत जर महाविकास आघाडीने धनगरांच्या प्रश्नांची सोडवणूक नाही केली तर पुढील काळात धनगर समाज येणाऱ्या निवडणुकीत त्यांना जागा दाखवेल असा इशाराही ऑल इंडिया धनगर समाज महासंघाने दिला आहे.