तोतया लष्करी अधिकाऱ्यास अटक
By admin | Published: October 2, 2016 01:27 AM2016-10-02T01:27:20+5:302016-10-02T01:27:20+5:30
कधी कर्नल तर कधी मेजर असल्याचे सांगून अनेकांना गंडा घालणाऱ्या ठगाला भायखळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सागर मिश्रा असे प्रतापी ठगाचे नाव आहे. त्याच्या उच्च राहणीमानामुळे
मुंबई : कधी कर्नल तर कधी मेजर असल्याचे सांगून अनेकांना गंडा घालणाऱ्या ठगाला भायखळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सागर मिश्रा असे प्रतापी ठगाचे नाव आहे. त्याच्या उच्च राहणीमानामुळे नागरिक त्याच्या भूलथापांना बळी पडले.
मीरा रोड येथील रहिवासी असलेला मिश्रा याने आर्मीचे स्टिकर असलेल्या गाडीचे फोटो ओएलएक्सवर टाकले, हे स्टिकर्स बघून आणि फेसबुकवरील याचे हे सगळे फोटो बघून आपण एखाद्या मेजरकडून गाडी विकत घेत असल्याचा ग्राहकांचा समज व्हायचा. फेसबुकवर त्याने आर्मी युनिफॉर्ममधील फोटोही पोस्ट केले. त्यामुळे लष्करी अधिकारी असल्याने आपली फसवणूक होणार नाही. या विचाराने अनेकांनी त्याच्याशी संपर्क साधून गाडीबाबत व्यवहार केला. व्यवहारानंतर मिश्राने गाडी देण्याबाबत टाळाटाळ केल्याने आपली फसवणूक झाल्याचे नागरिकांच्या लक्षात आले.
फेब्रुवारीमध्ये भायखळा येथील एहमद हुसेन यांनाही मिश्रा याने पाच लाखांची फसवणूक केली. हुसेन यांनी भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध सुरू करण्यात आला. तपास सुरू असताना मिश्रा मीरा रोड येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास पथकाने मिश्राला आॅडी विकत घेण्याच्या बहाण्याने सापळा रचला आणि त्याच्या मुसक्या आवळल्या.
न्यायालयाने त्याला ३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या चौकशीत त्याने आतापर्यंत अनेकांना गंडा घातल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्याविरुद्ध मीरा रोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्याच्या बँक खात्यातही विविध ठिकाणांहून पैसे जमा झाल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यानुसार त्याच्याकडे अधिक तपास सुरू असल्याची माहिती शिंगटे यांनी दिली. मिश्राच्या उच्च राहणीमानामुळे अनेक जण त्याच्या भूलथापांना बळी पडत होते. अशा प्रकारे आणखीन कुणाची फसवणूक झाली असल्यास नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहनही भायखळा पोलिसांनी केले आहे. (प्रतिनिधी)