मराठवाड्याला पडतोय व्यसनांचा विळखा
By Admin | Published: April 21, 2016 01:20 AM2016-04-21T01:20:38+5:302016-04-21T01:20:38+5:30
दुष्काळ, शेतकरी आत्महत्या या गोष्टींमुळे ‘मराठवाड्याकडे’ एकीकडे संवेदनशील दृष्टिकोनातून पाहिले जात असताना वाढती व्यसनाधीनता हादेखील आता तेथील चिंतेचा विषय बनत चालला आहे.
पुणे : दुष्काळ, शेतकरी आत्महत्या या गोष्टींमुळे ‘मराठवाड्याकडे’ एकीकडे संवेदनशील दृष्टिकोनातून पाहिले जात असताना वाढती व्यसनाधीनता हादेखील आता तेथील चिंतेचा विषय बनत चालला आहे. याभागात व्यसनाधीनतेचे प्रमाण हे ८० टक्के असून, वय झालेले व्यसनाधीन शेतकरी आपण गेल्यानंतर किमान शासनाकडून कुटुंबाला पैसे तरी मिळतील? या स्वार्थी विचाराने आत्महत्येकडे वळत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
संत ज्ञानेश्वरीला ७२५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून वारकरी साहित्य परिषदेने मराठवाड्यातील ८ जिल्ह्यातील ७५ तालुक्यांमध्ये आणि अमरावतीमधील ८ जिल्ह्यांच्या ५६ तालुक्यांमध्ये दौरे केले.
मराठवाड्यामध्ये दुष्काळ हा पाचवीला पूजला असूनही तिथले शेतकरी शासनावर अवलंबून बसले आहेत. पाहू, करू अशा पद्धतीने वेळ काढत आहेत आणि दुष्काळाचे खापर केवळ शासनावर फोडत आहेत, अशी निरीक्षणे वारकरी संप्रदायाने नोंदविली आहेत.