विरोधकांवर लक्ष ठेवण्यासाठी नेमले डिटेक्टिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 06:09 AM2019-04-08T06:09:03+5:302019-04-08T06:09:14+5:30
नवा ट्रेंड : अनैतिक संबंध, बदनामीकारक प्रसंगांची जमवाजमव, ‘हनी ट्रॅप’चेही आश्वासन
नवी दिल्ली : हल्ली निवडणुका हायटेक झाल्या आहेत. प्रचारातही अद्ययावत यंत्रणांचा वापर होऊ लागला आहे. अगदी त्याचप्रमाणे विरोधकांना ट्रॅक करण्यासाठी स्मार्ट पर्यायायाच वापर सुरू आहे. विरोधकांच्या गोटात काय चालले आहे हे तपासण्यापासून त्यांची प्रतिमा खराब करण्यासाठी विस्फोटक मुद्दे शोधण्याचे काम पक्षांनी खासगी डिटेक्टिव्ह एजन्सींना दिले आहे.
‘असोसिएशन आॅफ प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अँड इन्वेस्टिगेटर्स’चे अध्यक्ष कुंवर विक्रम सिंह यांनी अशी माहिती दिली. दिल्लीतील उमेदवारांनीदेखील विरोधी उमेदवारावर पाळत ठेवण्यासाठी संपर्क केल्याचे ते म्हणाले. मात्र, व्यावसायिक गोपनीयतेचा हवाला देत, त्यांनी उमेदवारांची नावे सांगण्यास नकार दिला. सिंह म्हणाले की, राजकीय पक्षांचे उमेदवार, अपक्ष उमेदवार आम्हाला कंत्राट देतात. विरोधकांच्या रणनीतीची माहिती, गुन्हेगारी पार्श्वभूमी याशिवाय अनैतिक संबंधांची माहितीही त्यांना हवी असते. विस्फोटक माहिती हाती लागल्यास त्याचा वापर करून प्रतिस्पर्धी उमेदवाराविरोधात प्रचार केला जातो.
केवळ उमेदवार नव्हे, उमेदवारी न मिळाल्याने दुखावलेले, स्वपक्षातील विरोधकास उमेदवारी मिळाल्याने नाराज झालेलेही खासगी गुप्तहेर कंपन्यांकडे येतात, असे त्यांनी सांगितले. जीडीएक्स गुप्तहेर कंपनीचे महाव्यवस्थापक महेशचंद्र शर्मा यांनी प्रत्येक निवडणुकीत अनेक जण आमची मदत घेतात, अशी कबुली दिली. एका ग्राहकाकडून अंदाजे १ ते ६० लाख रुपये घेतले जातात.
प्रतिस्पर्धी नेत्यांवर अशी ठेवतात पाळत
प्रतिस्पर्धी उमेदवाराची संपूर्ण माहिती गोळा केली जाते. त्यात सोशल मीडियावरील अपडेट्सपासून ते नजीकच्या सर्व आप्तेष्टांची माहिती जमविली जाते. उमेदवाराचा फोन 'ट्रॅक' केला जातो. त्याच्या प्रचारफेऱ्यांमध्ये दोघा-तिघांना योजनापूर्वक पाठविले जाते. जमवलेल्या माहितीतून स्फोटक माहिती शोधली जाते. मोठी रक्कम मोजणाऱ्या ग्राहकाला प्रतिस्पर्धी उमेदवार वा त्याच्या जवळच्या व्यक्तीला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचे आश्वासनही या कंपन्या देत असतात.