राहणापूर जंगलात बिबट मृतावस्थेत आढळला
By admin | Published: January 20, 2016 02:17 AM2016-01-20T02:17:00+5:302016-01-20T02:17:00+5:30
आकोट तालुक्यातील राहणापूरनजीकच्या जंगलामध्ये बिबट मृतावस्थेत आढळला; मृत रोहीचे मांस खाल्याने मृत्यू झाल्याचा संशय.
आकोट (अकोला): सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या राहणापूरनजीकच्या जंगलामध्ये १९ जानेवारी रोजी बिबट मृतावस्थेत आढळून आला. घटनास्थळावर मृत बिबट्याच्या बाजूला रोहीचे अवशेष सापडले. एकाच वेळी दोन वन्यप्राण्यांच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली असून, या घटनेवरून सातपुड्यातील वन्यजीव असुरक्षित असल्याचे स्पष्ट होत आहे. आकोट तालुक्यातील राहणापूरनजीकच्या जंगलामध्ये दुपारच्या सुमारास महिला लाकडे वेचत असताना, त्यांना एक बिबट मृतावस्थेत आढळला. जवळच एक मृत रोहीसुद्धा पडलेला होता. या घटनेची माहिती महिलांनी ग्रामस्थांना दिली. माहिती मिळताच अकोला वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक वायाळ यांनी घटनास्थळ गाठून पंचनाम्यासह इतर प्रक्रिया पार पाडली. रोहीचे मांस खाल्याने मृत्यू? मृत बिबटाचे वय सात वर्षांपेक्षा जास्त असून, त्याने रोहीचे मांस भक्षण केले होते. तत्पूर्वी रोहीचा मृत्यू विषारी पदार्थ खाल्ल्यामुळे झाला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. बिबट मृत्युमुखी पडून १२ तासांपेक्षा जास्त वेळ झाल्याचा अंदाज वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक वायाळ यांनी व्यक्त केला. बिबटाचे घटनास्थळीच शवविच्छेदन केल्यानंतर त्याला जाळण्यात आले. या परिसरातील भुईशेंग या पिकाचा वन्यप्राण्यांपासून बचाव व्हावा, याकरिता शेतात थिमेटसारख्या विषारी पदार्थांचा वापर करण्यात येतो. थिमेट खाल्याने रोहीचा मृत्यू झाला असावा व रोहीचे मांस भक्षणामुळे बिबट मृत्युमुखी पडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच बिबटाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.