पुण्याच्या डेट्रॉईटला कचऱ्याचे ग्रहण

By Admin | Published: January 20, 2017 12:46 AM2017-01-20T00:46:13+5:302017-01-20T00:46:13+5:30

औद्योगिक वसाहतीचा झालेला विकास, वाढते नागरीकरण यामुळे चाकणचा झपाट्याने विकास होत आहे.

Detroit receives ebb in Detroit of Pune | पुण्याच्या डेट्रॉईटला कचऱ्याचे ग्रहण

पुण्याच्या डेट्रॉईटला कचऱ्याचे ग्रहण

googlenewsNext


चाकण : औद्योगिक वसाहतीचा झालेला विकास, वाढते नागरीकरण यामुळे चाकणचा झपाट्याने विकास होत आहे. भारताचे ‘डेट्रॉईट’ समजल्या जाणाऱ्या चाकणकरांना मात्र अनेक नागरी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. उद्योगनगरीत प्रवेश करताच कचऱ्याच्या ढिगांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. नगर परिषदेचे कचरा व्यवस्थापनासाठी योग्य नियोजन नसल्याने ही समस्या गंभीर रूप धारण करीत आहेत.
शहरातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, त्यामुळे चाकणकर नागरिक त्रस्त आहेत. चाकण शहर प्लॅस्टिक्मुक्त केव्हा होणार? असा सवाल नागरिकांमधून होत आहे. प्लॅस्टिक पिशव्यांवर त्वरित बंदी आणून कापडी पिशव्या वापरण्याची सक्ती करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
कचऱ्याच्या ढिगात मोठ्या प्रमाणावर हॉटेलमधील शिळे अन्न, भाज्या, प्लॅस्टिक, केशकर्तनालायातील कापलेले केस, मोकळ्या बाटल्या, हॉस्पिटलमधील रुग्णांच्या उपचारांनंतरच्या टाकाऊ वस्तू, खराब झालेल्या फळभाज्या व पालेभाज्या आदींचा समावेश असतो. या ठिकाणांहून जाताना नागरिक अक्षरश: नाकाला रुमाल लावून जातात. या कचऱ्यातून दुर्गंधी सुटत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कचऱ्याच्या ढिगातील प्लॅस्टिकच्या पिशव्या जनावरांच्या पोटात जाऊन त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रत्येक वॉर्डातील कचरा गोळा करण्यासाठी नगर परिषदेने विभागवार कचराकुंड्या ठेवून, कर्मचारी नेमून व घंटागाड्या सुरू करूनही नागरिकांना कचराकुंड्यांमध्ये अथवा घंटागाडीतच नेऊन टाकण्याची सवय लागलेली नाही. त्यातच अनेक ठिकाणच्या कचराकुंड्या गायब असल्याने रस्तोरस्ती, गल्लीबोळांत, रस्त्याच्या कोपऱ्यावर पडलेल्या कचऱ्याचे विदारक चित्र चाकण भागात सर्रास पाहायला मिळते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
चाकणमधील काही भागात रोज हमखास उघड्यावर कचरा टाकला जातो. भाजी बाजारात तर दर शनिवारी, रविवारी, बुधवारी व गुरुवारी मोठा बाजार भरण्याच्या दिवशी कचऱ्याचे ढीग साचल्याचे दृश्य बारमाही आहे. अप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, पी. के. फाउंडेशन, गणेश मंडळे, लायन्स व रोटरी क्लब यासारख्या काही स्वयंसेवी संस्था-संघटना वषार्तून एकदा स्वच्छता मोहीम राबवितात. सगळीकडील कचरा गायब होतो. मात्र, अवघ्या काही तासांमध्ये अस्ताव्यस्त कचऱ्याची पुन्हा तीच स्थिती पाहावयास मिळते. या ठिकाणी कचऱ्याचे पडलेले ढीग प्रशासनाबरोबरच संबंधित नागरिकांच्या बेपर्वाईची साक्ष देत आहेत. यातील ओल्या कचऱ्यामुळे परिसरात डास व माश्यांचा प्रादुर्भाव वाढला.
नगर परिषदेने यासाठी अधिक सक्षमपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याची भूमिका परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.
>सर्वच प्रभागांत कचरा व सांडपाण्याची समस्या
चाकण परिसरातील सर्वच प्रभागांत स्वयंघोषित कचराकुंड्या निर्माण झाल्या आहेत. या गावातील गावांमध्ये असलेल्या घंटागाड्या म्हणजे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ झाल्या आहेत. या गाड्यांचा येण्याचा नेम नसल्याने महिलांना कचरा कुठे टाकावा, असा प्रश्न पडतो. नाइलाजाने त्यांना तो परिसरातीलच मोकळ्या जागेत नेऊन टाकावा लागतो. सांडपाण्याचीही अशीच अवस्था आहे. अनेक ठिकाणी गटारांची कामे झाली नाहीत. काही ठिकाणी त्यांची दुरवस्था झाल्याने हे पाणी रस्त्यावरूनच वाहते.

Web Title: Detroit receives ebb in Detroit of Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.