देवदचा पूल धोकादायक
By Admin | Published: October 17, 2016 02:35 AM2016-10-17T02:35:15+5:302016-10-17T02:35:15+5:30
गाढी नदीवर देवद गाव ते नवीन पनवेलला जोडणारा पूल धोकादायक झाला आहे.
नवी मुंबई : गाढी नदीवर देवद गाव ते नवीन पनवेलला जोडणारा पूल धोकादायक झाला आहे. १० हजार नागरिकांना या पुलावरून ये - जा करावी लागत आहे. कोणत्याही क्षणी पूल कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून पाठपुरावा केल्यानंतरही प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याने रहिवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी शासनाने गाढी नदीवर छोटा पूल बांधला आहे. या पुलावरून अनेक वर्षांपासून या परिसरातील नागरिकांची रहदारी सुरू आहे. देवद परिसराची लोकसंख्या १० हजारपेक्षा जास्त झाली आहे. येथील नागरिकांना शाळा, मार्केट व इतर कामांसाठी नवीन पनवेलला जावे लागते. रहदारी वाढल्यामुळे हा पूल धोकादायक बनला आहे. पुलाला अनेक ठिकाणी तडे गेले असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी नवीन पूल बांधण्याची मागणी केली आहे. ग्रामपंचायतीनेही त्याविषयी ठराव जिल्हा परिषदेकडे दिले आहेत. पण याविषयी काहीही कार्यवाही होत नसल्याने देवद गाव ते नवीन पनवेल पूल समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीनेही २०११ पासून वारंवार पाठपुरावा सुरू केला आहे. जिल्हा परिषद, सिडको व शासनाकडे पत्रव्यवहार केले आहेत. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व उरणचे माजी आमदार विवेक पाटील यांनीही जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला होता. याशिवाय विधानसभेमध्येही आवाज उठविला होता. देवद परिसराचा नैनामध्ये समावेश झाला आहे. येथील पायाभूत सुविधेची जबाबदारी सिडकोवर असल्याने त्यांच्याकडेही पाठपुरावा सुरू केला आहे.
महाडमध्ये सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यानंतर देवदवासीयांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणत्याही क्षणी पूल कोसळून मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्रामस्थांनी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. देवद परिसरामध्ये शाळा, बाजारपेठ नाही, दवाखाने, रिक्षा, बससेवाही नसल्याने प्रत्येक गोष्टीसाठी नवीन पनवेलला जावे लागत आहे. जीवन प्राधिकरणाने बांधलेला पूल धोकादायक झाला आहे. जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. देवद परिसरात सनातन संस्थेचा आश्रम असल्याने तेथे मोठ्याप्रमाणात भक्तगण येत असतात. पाच वर्षांपासून नवीन पुलासाठी पाठपुरावा सुरू आहे. पण आता नैना परिसराकडे या परिसराच्या विकासाची जबाबदारी असल्याचे सांगितले जात आहे. ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करूनही हा प्रश्न सुटत नाही. दुर्घटना होण्यापूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रामध्ये करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
>अपघातास जबाबदार कोण?
सुकापूर, पाली देवद परिसराचे पूर्णपणे शहरीकरण झाले आहे. या परिसरामध्ये मोठ्याप्रमाणात इमारतींचे बांधकाम झाले आहे.
यापूर्वी जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेला हा विभाग आता नैना परिसरात येत आहे. येथे पूल बांधण्याची जबाबदारीही नैनाची म्हणजेच सिडकोची आहे.
सिडकोनेही यासाठीचा नकाशाही तयार केला आहे. पण प्रत्यक्षात कार्यवाही जुना पूल कोसळल्यानंतर करणार का, असा प्रश्न आता रहिवासी विचारू लागले आहेत.
अपघात झाल्यास त्याची जबाबदारीही पूर्णपणे निष्काळजीपणा करणाऱ्या प्रशासनाची असेल, असे मत रहिवासी व्यक्त करू लागले आहेत.
>पाठपुरावा
१० फेब्रुवारी २०११
विचुंबे ग्रामपंचायतीचा जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा
१७ मार्च २०११
उरण विधानसभेचे आमदार विवेक पाटील यांचे जिल्हा परिषदेला पत्र
२८ मार्च २०११
पूल समितीने जिल्हा परिषदेच्या उप अभियंत्यांना पत्र दिले
५ एप्रिल २०११
आमदार प्रशांत ठाकूर यांनीही पुलाचे काम करण्याचे पत्र दिले
२० एप्रिल २०११
उप अभियंत्यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले पत्र
२१ एप्रिल २०११
रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांनी सिडको व्यवस्थापनाकडे आराखडे मागितले.
११ जुलै २०१३
सिडकोने देवद पूल समितीला पत्राचे उत्तर दिले.
२७ मार्च २०१५
देवद पूल समितीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन
३ जुलै २०१५
आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत आवाज उठविला
याविषयी काहीही कार्यवाही होत नसल्याने देवद गाव ते नवीन पनवेल पूल समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीनेही २०११ पासून वारंवार पाठपुरावा केला आहे.
देवद परिसराचा नैनामध्ये समावेश झाला आहे. येथील पायाभूत सुविधेची जबाबदारी सिडकोवर असल्याने त्यांच्याकडेही पाठपुरावा सुरू केला आहे.