सबनीसांकडून साहित्याच्या व्यासपीठाचे अवमूल्यन
By Admin | Published: January 10, 2016 12:59 AM2016-01-10T00:59:15+5:302016-01-10T00:59:15+5:30
प्रतिष्ठित अशा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून आलेल्या व्यक्तीने त्या पदाची, साहित्याच्या व्यासपीठाची प्रतिष्ठा, मोठेपणा वाढविण्याचे काम करणे आवश्यक
पुणे : प्रतिष्ठित अशा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून आलेल्या व्यक्तीने त्या पदाची, साहित्याच्या व्यासपीठाची प्रतिष्ठा, मोठेपणा वाढविण्याचे काम करणे आवश्यक असते; पण श्रीपाल सबनीस यांनी स्वत:च्या प्रसिद्धीसाठी पदाचा गैरवापर केला, अशी टीका भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वक्तव्य करून साहित्य व्यासपीठाचे अवमूल्यन केले असल्याचे ते म्हणाले.
संमेलनाध्यक्षांनी राजकारणावर बोलू नये, असे अजिबात नाही. दुर्गा भागवत यांनी आणीबाणीबाबत, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यलढ्याबाबत साहित्याच्या व्यासपीठावरून लढा उभारण्याचे आवाहन केले होते; पण कसे बोलावे हे समजले पाहिजे. साहित्य क्षेत्राला एक प्रतिष्ठा, मोठेपणा आहे. तो अध्यक्षांना सांभाळता आला पाहिजे, तो वाढविता आला पाहिजे, असे भंडारी म्हणाले. (प्रतिनिधी)
संमेलनाच्या उद्घाटनासाठी आणि समारोपासाठी भाजपाचे मोठे नेते म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विनोद तावडे येणार का, याबाबत भंडारी म्हणाले, संमेलनाच्या निमंत्रणामध्ये निमंत्रित म्हणून त्यांची नावे टाकण्यात आली आहेत; पण ते येतील का, याबाबत आताच काही सांगता येणार नाही. त्यासाठी अजून आठवडा आहे. ‘निमंत्रित म्हणून नाव टाकले म्हणजे, येतीलच असे नाही’ असे सूचक विधानही त्यांनी केले.
राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना साहित्य संमेलनाला शासनाकडून २५ लाख एवढी मोठी रक्कम देणे योग्य नाही. याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे, अशी माहिती भंडारी यांनी दिली.