गुगलची मराठीला झक्कास भेट; ४० नव्या फाँट्ससह लुटा टंकलेखनाची मजा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 02:22 PM2018-07-18T14:22:43+5:302018-07-18T15:00:23+5:30
गुगलने नवे फाँटस उपलब्ध करुन दिले आहेत, ते कसे वापरता येतील?
मुंबई- देवनागरीमध्ये टाइप करायचं झालं की केवळ फाँटचे काही मोजकेच पर्याय उपलब्ध होते. त्यामुळे टंकलेखनावर मर्यादा येत होत्या व ठराविक फाँट्स वापरावे लागायचे. मात्र आता गूगलने 40 पेक्षा अधिक देवनागरी फाँट्सची भेट टंकलेखकांना दिली आहे. यामुळे देवनागरीत टाइप करणं आणखी सोपं होऊन त्यामध्ये पर्याय मिळणार आहेत.
नवे फाँट्स कसे वापराल ?
1) देवनागरी फॉंट (टंक) वापरायचे असतील तर सर्वप्रथम गुगल डॉक्समध्ये जा.
2) आता नवीन डॉक्युमेंट तयार करा. फॉंटचा पर्याय निवडा... अधिक फॉंट हा पर्याय निवडा.
3) त्यानंतर स्क्रिप्टमध्ये देवनागरी हा पर्याय निवडा.
4) येथे तुम्हाला नवे फाँट्स दिसतील, त्यापैकी तुम्हाला हवा तो फाँट निवडून डाऊनलोड करा.
5) त्यानंतर तुम्हाला टाइप करताना हवा तो फॉंट निवडा. फॉंट द्वैलिपिक असतात, त्यामुळे मराठी टंकलेखनासाठी बराहा किंवा अन्य कुठले सॉफ्टवेअर वापरत नसाल तर टूलबारमधील मराठीच्या म वर क्लिक करा.
नव्या फाँटसचा सर्वांना फायदा होणार
इंटरनेटवर मराठीत टंकलेखन करताना आजपर्यंत चांगल्या टंकांची (फाँट) उणिव जाणवायची. पण गुगल फाँटने आपल्याला देवनागरी लिपीतील ४४ फाँट उपलब्ध करुन दिले आहेत. त्यांमध्ये सेरीफ, सॅन सेरीफ, हस्तलिखिता सदृश्य अशी विविधता आहे. हे टंक ओपन सोर्स आहेत. हे फाँट सध्या गुगल डॉक्ससाठी तसेच तुमच्या वेबसाइट आणि ब्लॉगमध्ये वापरता येतील. आजवर मोठ्या वर्तमानपत्र आणि कंपन्यांनाच आकर्षक मराठी टंकांमध्ये वेबसाइट बनवणे शक्य होतं. आता सर्वसामान्य ब्लॉगर आणि नेटकरांनाही शक्य झाले आहे. आपल्या भाषेत मजकूर लिहिणे आणि वाचणे यातच आजवर आपल्याला आनंद मानून घ्यावा लागायचा. आता या नवीन पर्यायांमुळे इंटरनेटवरील मराठी अक्षरं अधिक सुबक तसेच डौलदार दिसू लागतील. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी अल्फाबेट (गुगल) आणि फेसबुकसारख्या कंपन्या भारतीय भाषांना महत्त्वं देऊ लागल्या आहेत. इंटरनेट, मोबाइल आणि समाजमाध्यमांद्वारे हाकारल्या जाणाऱ्या या जगात स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येकाला मराठीत सुलभपणे टंकलेखन करता येईल यासाठी राज्य शासन, खाजगी क्षेत्र आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था तसेच कार्यकर्त्यांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे.
अनय जोगळेकर,सदस्य, कार्यकारी समिती, राज्य मराठी विकास संस्था