महिलांचा आदर तेथे देवतांचे वास्तव्य - विश्वास नांगरे-पाटील
By admin | Published: August 31, 2016 07:38 PM2016-08-31T19:38:56+5:302016-08-31T19:38:56+5:30
ज्याठिकाणी महिलांचा आदर व सन्मान केला जातो तेथे देवतांचे स्थान व वास्तव्य असते़. मात्र जेथे महिलांचा अपमान केला जातो, तिच्यावर अत्याचार होतो, आदर व सन्मान केला
Next
>ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. 31 - ज्याठिकाणी महिलांचा आदर व सन्मान केला जातो तेथे देवतांचे स्थान व वास्तव्य असते़. मात्र जेथे महिलांचा अपमान केला जातो, तिच्यावर अत्याचार होतो, आदर व सन्मान केला जात नाही. त्याठिकाणी कोणतीही क्रिया सफल होत नाही. ते रसातळाला जातात, असे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे -पाटील यांनी केले आहे़.
सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित निर्भया पथकाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते़. व्यासपीठावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी आ. सुधाकरपंत परिचारक, आ. भारत भालके, आ. दत्तात्रय सावंत, पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, मदारगनी मुजावर आदी उपस्थित होते.
‘यत्र कार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवत$:’ हा संस्कृत श्लोक म्हणून विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, लहानपणी पिता रक्षण करतो, मोठे झाल्यानंतर पती आणि वृद्धपणी पुत्र रक्षण करतो, असे असतानाही महिला असुरक्षित का? असा प्रश्न पडतो़ दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटनेत वाढत आहेत. ते रोखण्यासाठी निभर्या पथकाची स्थापना केली आहे़ गुन्हेगाराला शिक्षा होण्यापूर्वी गुन्हाच घडणार नाही, याची काळजीही हे निर्भया पथक घेणार आहे. त्यासाठी जो कोणी विनयभंग, छेडछाड करेल त्याला अगोदर पोलीस ठाणे, नंतर त्याच्या घरी आई, वडील, भाऊ, बहीण यांच्यासमोर बसवून समुपदेशन केले जाईल. त्यातून तो सावरला तर ठिक अन्यथा कठोर शिक्षा केली जाईल. तरुणींनी स्वत:चे रक्षण कसे करावे, याविषयी मार्गदर्शन केले. ‘स्वातंत्र देवतेची विनवणी’ ही कविता सादर करून त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले, स्त्रीयांना देवता मानणा-या या देशात माता, बहिणींच्या रक्षासाठी निर्भया पथकाची स्थापना करावी लागते याची खंत वाटते. तरुणांनो आता मुलींच्या रक्षणासाठी शिवछत्रपतींचे मावळे व्हा, असा सल्ला तरुणांना त्यांनी दिला.
आ. भारत भालके म्हणाले, अनेक महापुरुषांच्या गौरवशाली या देशात कोठेतरी एखादी अत्याचाराची घटना घडते आणि जागतिक पातळीवर देशाची बदनामी होते़ त्यामुळे संस्कार व संस्कृती शिकविणाºया या भूमीत असे प्रकार घडणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे़ याप्रसंगी माजी आ़ सुधाकरपंत परिचारक, आ़ दत्तात्रय सावंत यांनीही मनोगत व्यक्त केले़ कार्यक्रमानंतर सभागृहाबाहेर तैनात झालेल्या निर्भया पथकाचा हिरवा झेंडा दाखवून पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
प्रास्ताविक पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी केले़ सूत्रसंचालन विक्रम विस्किटे यांनी केले तर आभार पोलीस उपअधीक्षक दिलीप चौगुले यांनी मानले.
निर्भया पथकासाठी चार गाड्या भेट...
तरुणी, महिलांच्या रक्षणासाठी तैनात करण्यात आलेल्या निभर्या पथकासाठी पांडुरंग साखर कारखान्यातर्फे एक व पंढरपूर अर्बन बँकेकडून एक अशा दोन गाड्या भेट देणार असल्याचे सुधाकरपंत परिचारक यांनी जाहीर केले़ तसेच आ़ भारत भालके यांनी विठ्ठल साखर कारखान्यातर्फे एक आणि आमदार निधीतून एक अशा दोन गाड्या भेट देणार असल्याचे सांगितले़ या निर्भया पथकासाठी जिल्ह्यातील सर्व आमदारांनी आमदार निधीतून एक गाडी भेट द्यावे, अशी विनंती करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
आता अत्याचार करणा-यांची यादी...
घरफोडी करणारे, खून, दरोडेखोर, अवैध धंदे करणाºयांची यादी पोलीस ठाण्यात असते़ त्या प्रमाणेच आता विनयभंग, बलात्कार, छेडछाड, लैंगिक अत्याचार करणारे, बालकांचे शोषण करणा-यांची यादी तयार करून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
गणेशोत्सवात निर्भया पथक २४ तास कार्यरत...
गणेशोत्सव काळात सार्वजनिक ठिकाणी तरुणी व महिलांवर अत्याचार, विनयभंग होण्याची शक्यता असते़ त्यामुळे या काळात निर्भया पथक साधे वेशात कार्यरत राहणार असल्याचे विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले़.