कृषी विकासाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करणार
By admin | Published: October 18, 2015 02:21 AM2015-10-18T02:21:09+5:302015-10-18T02:21:09+5:30
गहू, तांदूळ यासारखी पारंपरिक शेती करून शेतकऱ्यांचे भविष्य बदलणार नाही. त्यामुळे शेती विकासासाठी नवनव्या संकल्पना राबवाव्या लागतील. अशा सर्व संकल्पांचे एक ‘व्हिजन
नागपूर : गहू, तांदूळ यासारखी पारंपरिक शेती करून शेतकऱ्यांचे भविष्य बदलणार नाही. त्यामुळे शेती विकासासाठी नवनव्या संकल्पना राबवाव्या लागतील. अशा सर्व संकल्पांचे एक ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करून ते राज्य सरकारला सादर केले जाईल. राज्य सरकारने या डॉक्युमेंटचा आधार घेऊन काही योजना अमलात आणल्या तर शेतकऱ्यांना मदत होईल, असा विश्वास केंदीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
अॅग्रोव्हिजन प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत गडकरी बोलत होते. या वेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अॅग्रोव्हिजनचे संयोजक गिरीश गांधी, रणजित देशमुख, खा. कृपाल तुमाने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रमेश बंग, आ. सुनील केदार, अॅग्रोव्हिजनचे सचिव रमेश मानकर, रवी बोरटकर यांच्यासह आमदार व मान्यवर उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, कृषी क्षेत्रात बदल घडवायचा असेल तर पुढील २५ वर्षांचा विचार केला पाहिजे. शेतीत, जोडधंद्यात यशस्वी प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा इतर शेतकऱ्यांसमोर मांडल्या पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या जमिनीचे आरोग्य तपासयला हवे. यासाठी आमदारांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना सॉईल हेल्थ कार्ड उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी केले. डाळींचे भाव २०० रुपयांपर्यंत पोहचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी डाळींच्या उत्पदनाकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
महामार्गाच्या बाजूला मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जाणार आहे. यावर पाच हजार कोटी रुपये खर्च होणार आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा. मागेल त्याला काम दिले जाईल.
पण कामात बेईमानी केली तर जेलमध्ये टाकल्याशिवाय सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. विदेशात बायो प्लास्टिकची मोठी मागणी आहे. उसाचे चिपाड,
मका आदी पिकांपासून बायो प्लास्टिक तयार केले जाते. शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला तर एकट्या विदर्भात ५० हजार कोटींचे बायो प्लास्टिक तयार होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.
येत्या काळात शेतकऱ्यांचे मोठे गट तयार करून त्यांना फूलशेतीचे प्रशिक्षण दिले जाईल. येथील
फुले विदेशात पाठविली जातील. यासाठी लवकरच नागपूर बाजार समितीला जागा उपलब्ध करून
दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ताडोबात इलेक्ट्रिक बॅटरीवरील गाड्या
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. मात्र, प्रदूषण व आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून एका दिवशी मर्यादित गाड्या जंगलात सोडल्या जातात. यामुळे विदेशी पर्यटकांनाही जंगल सफारीची बुकिंग मिळणे कठीण झाले आहे. येत्या काळात ताडोब्यात इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या उपलब्ध करून दिल्या जातील. त्यामुळे ध्वनी व वायु प्रदूषणाचा प्रश्न सुटेल व पर्यायाने जंगलात सोडणाऱ्या गाड्यांची संख्या वाढविता येईल, असेही गडकरी यांनी सांगितले.