१७ हजार गावांमधील जलस्रोतांचा विकास करणार

By admin | Published: April 10, 2017 04:22 AM2017-04-10T04:22:56+5:302017-04-10T04:44:34+5:30

राज्यातील १७ हजार गावांतील तलाव, विहिरी, नद्या आणि इतर जलस्रोतांचा विकास करण्याच्या अभियानाची सुरुवात

Develop water resources in 17 thousand villages | १७ हजार गावांमधील जलस्रोतांचा विकास करणार

१७ हजार गावांमधील जलस्रोतांचा विकास करणार

Next

मुंबई : राज्यातील १७ हजार गावांतील तलाव, विहिरी, नद्या आणि इतर जलस्रोतांचा विकास करण्याच्या अभियानाची सुरुवात, रविवारी जैन इंटरनॅशनल आॅर्गनायझेशनतर्फे (जिओने) करण्यात आली. महावीर जयंतीनिमित्त आॅगस्ट क्रांती मैदानात रविवारी सायंकाळी आयोजित विशेष कार्यक्रमात जिओने ही घोषणा केली. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत भगवान महावीर यांची महाआरती पार पडली. जिओच्या संचालकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.
विविध सामाजिक उपक्रमांतून महिलांमध्ये जनजागृती करणाऱ्या अमृता फडणवीस यांच्या ट्रस्टला जिओतर्फे ३९ लाख रुपयांचा निधी देण्यात आला. या वेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ८०० मुलांचा शैक्षणिक खर्चही जैन बांधवांनी उचलला. अवयव, श्रम आणि धन यांच्या दानामध्ये जैन समाजाचा मोलाचा वाटा आहे. या समाजाच्या मोलाच्या वाट्यामुळेच देश प्रगतिपथावर आहे. लवकरच देश प्रगतिशील वर्गामधून प्रगत देशांच्या यादीत गेलेला दिसेल, असे प्रतिपादन अमृता फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘जैन समाजाने ताकदीनीशी केलेल्या मतदानामुळे ऐतिहासिक विजय मिळाला. पारदर्शकतेच्या मुद्द्यावर आशीर्वाद मागितला होता. तो मतदानातून दिला. देशासह जगाला महावीरांच्या विचारांची गरज आहे.
निसर्गाचा प्रकोप ही मोठी समस्या समोर उभी आहे. सर्वांना जगण्याचा अधिकार असून, संतुलन निर्माण करण्यासाठी महावीरांच्या विचारांचे पालन करायला हवे. गोरक्षण हा त्याचाच भाग आहे. म्हणूनच पशुधनातून नैसर्गिक खतांच्या माध्यमातून जमिनीची पत वाचवायला हवी. भगवान महावीरांच्या विचाराने काम करत राहाणार,’ असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले.
जैन संत नयपदम सागर महाराज यांनी उपस्थित जैन बांधवांना मार्गदर्शन केले. या वेळी जैन समाजासाठी स्वस्तात औषधे आणि एका मेडिक्लेम योजनेची घोषणा करण्यात आली, तसेच साध्वी श्री मयणाश्री यांनी २५ वर्षांपेक्षा लहान वय असलेल्या मुला-मुलींच्या लग्नाचा कायदेशीर हक्क आई-वडिलांकडे असावा, अशी मागणी सरकारकडे केली. या कार्यक्रमाला महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांतील उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सनदी अधिकारी उपस्थित होते. महावीर जन्मोत्सवानिमित्त मुंबईत विविध ठिकाणी सात लाख लाडवांचे वाटप जिओने केले. या वेळी केंद्रीय विज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि
आ. मंगलप्रभात लोढा उपस्थित
होते. (प्रतिनिधी)

महावीर जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन व्हावा - राज्यपाल
भगवान महावीरांचा जन्मदिवस हा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून घोषित होण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव यांनी रविवारी केले. भारत जैन महामंडळ यांच्या वतीने पाटकर हॉल येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी आचार्य पदमानंदजी महाराज, मुनी महेंद्र कुमार, आमदार राज पुरोहित, राजेंद्र पटणी, रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस.एस. मुंदडा, भारत जैन महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष के.सी. जैन, तरुण जैन, पृथ्वीराज कोठारी, के.सी. सेठी, प्रमोद कटारिया आदी मान्यवर उपस्थित होते.
आज जगात सर्वत्र हिंसाचाराचे वातावरण निर्माण होत असताना भगवान महावीरांचा सर्व मतांचा आदर करण्याची शिकवण देणारा अनेकांतवाद व अहिंसा जगाला विनाशापासून वाचवून शांती, समृद्धी व विकासाच्या वाटेवर नेऊ शकते, असा विश्वासही राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: Develop water resources in 17 thousand villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.