पेसा निधीतून वंचितांचा विकास साधावा
By admin | Published: June 8, 2016 02:47 AM2016-06-08T02:47:47+5:302016-06-08T02:47:47+5:30
वंचितांच्या विकासाच्या नावाखाली येणारा निधी हा ज्यांच्यासाठी असतो.
वसई/उसगाव डोंगरी: वंचितांच्या विकासाच्या नावाखाली येणारा निधी हा ज्यांच्यासाठी असतो. त्यांच्यापर्यंत जसा पोहचायला हवा होता. तसा तो आजवर पोहचला नाही. १०० रूपयातले ५ किंवा १० रूपये लाभार्थी पर्यंत जातात आणि उरलेले मधल्या-मध्ये ठेकेदारांच्या आणि यंत्रणेच्या खिशात जातात. त्यामुळे स्वांतंत्र्याच्या ७० वर्षा नंतरही विकासापासून वंचित असलेले गाव पाडे आपल्याला आजही पहायला मिळतात. म्हणून कार्यशाळेसाठी उपस्थित असलेल्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी गावाच्या विकासासाठी आलेली पै न पै वंचितांच्या विकासासाठीच खर्च होईल हे पाहणे आवश्यक ठरते. आदिवासींच्या हक्काचा पेसा निधी आणि १४ व्या वित्त आयोगाच्या निधी यातून प्राधान्याने वंचितांच्या विकसासेच कार्य व्हायला हवे. असे प्रतिपादन विधायक संसदेच्या संस्थापिका व श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्षा विद्युल्लता पंडित यांनी केले. त्या विधायक संसद संस्थने उसगाव डोंगरीतील साने गुरूजी प्रशिक्षण संकुलात आयोजित केलेल्या एकदिवसीय ग्रामपंचायत सदस्य कार्यशाळेच्या समारोपीय भाषणामध्ये बोलत होत्या.
कार्यशाळेत विधायक संसदेचे सहसंचालक किसन चौरे यांनी कार्यशाळेच्या प्रास्तविकात श्रमजीवी संघटनेमुळेच महाराष्ट्रात पेसा लागू झाला असे सांगितले. ठिणगीच्या कार्यकर्त्या व माजी जि. प. सदस्या आणि गोणे फिरिंगपाडा ग्रामपंचायतीच्या (ता.भिवंडी) माजी सरपंच संंगिता भोमटे, मालबिडी ग्रामपंचायत (ता.भिवंडी) चे माजी सरपंच व नवनिर्वाचित सदस्य जयेंद्र गावित, शिरोळे-बोसे ग्रामपंचायत (ता.भिवंडी) चे माजी सरपंच व नवनिर्वाचित सदस्य सुनिल लोणे यांनी ग्रामपंचातीतील कार्यानुभवाव्दारे ग्रामपंचायत सदस्यांचे अधिकार आणि कर्तव्यांविषयी प्रभावी विवेचन केले. विधायक संसदेचे सहसचिव प्रदीप खैरकर यांनी गावाचा विकास आराखडा तयार तयार करताना घ्यावयाच्या खबरदारीबद्दल शिबीरात पीपीटीच्या सहाय्याने मार्गदर्शन केले. ग्रामविकास आराखडा प्रशिक्षक महेश भोईर यांनीही मार्गदर्शन केले. ठाणे, पालघर व नाशिक जिल्हयातून १०७ ग्रामपंचायत सदस्य या कार्यशाळेत सहभागी झाले होते. श्रमजीवी संघटनेचे कार्याध्यक्ष केशव नानकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. शिबिराच्या संयोजनात संघटनेचे सरचिटणिस बाळाराम भोईर, सहसरचिटणिस विजय जाधव यांचेसह सुरेश रेंजड, दशरथ भालके, सरिता जाधव, केशव पारधी, गणेश उंबरसाडा, कैलास तुंबडा, संतोष धिंडा, प्रकाश खोडका, आशा भोईर, मनोज काशिद, जनार्दन ठाकरे, यांचा मोठा सहभाग होता. (वार्ताहर)
पाहुण्यांना, अभ्यागतांना दिले जांभळाचे रोप
जागतिक पर्यावरण दिनी झालेल्या कार्यशाळेत त्यांनी गाव विकास आराखडयाच्या माध्यमातून गावक्षेत्रातील डोंगरभागामध्ये मोठया प्रमाणात चर खोदून पाणलोट विकासाची कामे करण्याचे आणि झाडे लावण्याचे आवाहन केले. शिबिरार्थीच्या कार्यशाळेतील स्वागताचा भाग म्हणून गुलाब पुष्पाऐवजी ग्रामपंचायत सदस्याला घरी जाताना जांभळाचे रोप संस्थेच्या वतीने देण्यात आले.