विकास आराखड्यातील रस्त्यांसह मिसिंग लिंक ठामपा विकसित करणार
By admin | Published: April 5, 2017 03:52 AM2017-04-05T03:52:30+5:302017-04-05T03:52:30+5:30
मिसिंग लिंक विकसित करण्याबरोबर विकास आराखड्यातील शिल्लक रस्त्यांचा मार्ग प्रशस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाणे : ठाणे महापालिकेने रस्त्यांचे नुतनीकरण आणि मिसिंग लिंक विकसित करण्याबरोबर विकास आराखड्यातील शिल्लक रस्त्यांचा मार्ग प्रशस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यासाठी तब्बल १६० कोटींची तरतूद प्रस्तावित केली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच रस्ता रुंदीकरणाचा नारळ आयुक्तांनी वाढविला असून आता यापुढे जाऊन येत्या काळात शहरातील अरुंद असलेले आणि अतिक्रमणाने बाधीत झालेले रस्ते रुंद होणार आहेत.
महापालिका हद्दीत ३५६ किमी लांबीचे रस्ते असून पैकी २४६ किमी लांबीचे डांबरी तर ११० किमी लांबीचे रस्ते सिमेंट काँक्रिटचे आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी रुंदीकरणाअंतर्गत रस्त्यावर असलेली बांधकामे व अतिक्रमणे हटविण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार २०१५-१६ आणि २०१६-१७ या आर्थिक वर्षात १४.४४ किमी लांबीचे १३ रस्ते हाती घेतले असून या वर्षात ४.७५ किमी लांबीच्या रस्त्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित कामे मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. तसेच विकास आराखड्यातील १७.६० किमी लांबीचे १९ रस्ते विकसित करण्याचे काम हाती घेतले असून सद्यस्थितीत ४.०५ किमी लांबीच्या रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे. मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या मिसिंक लिंक रस्त्याअंतर्गत २.२३ किमी लांबीचे २ रस्ते हाती घेतले असून त्यांचे काम प्रगतीपथावर आहे.
महापालिका हद्दीत भविष्यात होणारा विकास व त्याअनुषंगाने होणारी वाहतूककोंडी लक्षात घेता विकास आराखड्यातील रस्ते विकसित करण्यासाठी ५ वर्षाकरीता रोड डेव्हल्पमेंट व्हीजन प्लॅन तयार केला असून त्यामध्ये गायमुखपासून ते दिव्यापर्यंत ८६.५४ किमी लांबीचे ८१ रस्ते विकसित करण्याचे नियोजन आहे. हे रस्ते टप्प्याटप्प्याने हाती घेऊन पूर्ण करण्यात येणार असून २०१७-१८ या आर्थिक वर्षात विकास आराखड्यानुसार रस्त्यांचे रुंदीकरण, नवीन रस्त्यांसह मिसिंग लिंक विकसित करण्याअतंर्गत प्रथम टप्प्यात काही रस्ते हाती घेण्यात येणार आहेत. त्यानुसार या सर्व कामांसाठी १६० कोटींची तरतूद प्रस्तावित केली आहे.
त्यानुसार आता पहिल्या टप्यात पाच मॉडेल रस्त्यांची कामे हाती घेतल्यानंतर दुसऱ्या टप्यात आणखी नवीन मॉडेल रस्त्यांचे नियोजन हाती घेतले आहे. यासाठी ६ कोटींची तरतूद केली आहे. यूटीडब्ल्यूटी व सिमेंट काँक्रिटीकरण पद्धतीचे २०१६-१७ या आर्थिक वर्षात १८.१५ किमीचे ७५ रस्ते हाती घेतले असून सद्यस्थितीत ५.५८ किमी लांबींचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून उर्वरित रस्त्यांचे काम मार्च २०१८ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. यासाठी ४६ कोटींची आर्थिक तरतूद आहे. कोस्टल रोडच्या दृष्टीनेदेखील पालिकेने पावले उचलली असून गायमुख ते भिवंडी बायपासपर्यंत हा रस्ता एमएमआरडीएच्या माध्यमातून विकसित केला जाणार आहे. याशिवाय फूट हिल रोड मुंबईहून अहमदाबाद महामार्गाकडे जाणारी वाहतूक ही शहरातून घोडबंदर रोड मार्गे जात असून त्यामुळे ठाणे शहरात वाहतूककोंडी होत आहे. यावर पर्याय म्हणून मुंबईकडून येणारी वाहतूक श्रीनगर, पातलीपाडा, गायमुखमार्गे अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाकडे जाण्यासाठी फूट हिल रोड बांधण्याचे प्रस्तावित असून प्रथम टप्प्यात गायमुख ते पातलीपाडापर्यंत रस्ता बांधण्यात येणार आहे. यासाठी २०१७-१८ मध्ये १८ कोटींची तरतूद केली आहे.
कळव्यातील कोंडीवर उपाय म्हणून कळवा ते पारसिक लिंक रोड विकसित करणार असून कळवानाका ते रेतीबंदरकडे वळविण्यासाठी ३.९५ किमी लांबीचा व ३० मीटर रुंदीचा कळवा ते पारसिक लिंक रोड बांधण्याचे नियोजन आहे. (प्रतिनिधी)