बाबासाहेबांशी निगडीत स्थळांचा विकास करावा - राज्यपाल
By Admin | Published: July 4, 2016 04:19 AM2016-07-04T04:19:19+5:302016-07-04T04:19:19+5:30
मुंबई ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कमर्भूमी होती. तब्बल चाळीस वर्षे या भूमीत राहून त्यांनी कार्य केले.
मुंबई : मुंबई ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कमर्भूमी होती. तब्बल चाळीस वर्षे या भूमीत राहून त्यांनी कार्य केले. त्यांच्या स्मृती व कार्याशी निगडीत अनेक स्थळे मुंबईत आहेत. त्यामुळे मुंबईतील अशी स्थळे एकमेकांशी जोडून त्यांचा ‘डॉ. आंबेडकर सर्कीट’ म्हणून विकास करावा, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.
मुंबई शेअर बाजारातील कन्व्हेशन सभागृहात कल्पना सरोज फाऊंडेशनच्या वतीने आयोजित आंबेडकर रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात राव बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, खासदार रामदास आठवले, मुंबई स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक आशिष चौहान, फाऊंडेशनच्या अध्यक्षा कल्पना सरोज आदी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त अमेरिकेत राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्या कार्यक्रमाचा समारोप आजच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाने मुंबईत झाला.
यावेळी बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील, आयडीबीआयचे चेअरमन किशोर खरात, चरणदास निखाडे, आशिष चौहान, माजी आमदार बाबूलाल बच्छड, लक्ष्मी टी नरसिंहा, ज्योती रेड्डी, डॉ. अंजली मुखर्जी, वाहिनी देवी, जस्टिस विनूभाई भैरविया, राहूल नार्वेकर, सुबचन राम, प्रकाश रवी, विश्राम गमे, राहूल सिंग, राजलक्ष्मी राव, प्रवीण निखाडे, माजी सनदी अधिकारी आर. डी. शिंदे, आयूब खान, किरण सोनवणे, अनिरुद्ध वनकर आदींना आंबेडकर रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
समाजातील वंचितांच्या आर्थिक सामाजिक विकासाचे साधन म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाकडे पाहिले जाते. डॉ.आंबेडकर हे व्यासंगी अर्थतज्ज्ञ होते. औद्योगिकरणामध्ये दलितांना जास्त लाभ मिळायला हवा, असे त्यांचे मत होते. त्यामुळे दलित समाजातील उद्योजकांनी नोकरीच्या संधी निर्माण करायला हव्यात. केंद्र सरकारने तळागाळातील उद्योजकांसाठी विविध योजना आणून डॉ. आंबेडकर यांच्या विचारावर पाऊल टाकले आहे. कल्पना सरोज फाऊंडेशन आणि दलित चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडिस्ट्रीज या संघटनांनी एकत्र येऊन तरुणांना उद्योग उभारण्यासाठी मार्गदर्शन करावे. दलित महिला उद्योजिकांचे चेंबर सुरू करण्यात यावे, असे आवाहन राव यांनी केले.
तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती ही केवळ उत्सवी न राहता त्यांच्या विचार तळागाळापर्यंत पोचविणे हाच खरा उपक्रम होईल. डॉ. आंबेडकर यांचे कार्य वैश्विक होते. त्यामुळे या वैश्विक नेत्याचे जपानमध्ये पुतळा बसविण्यापासून ते लंडनमधील त्यांचे वास्तव्य असलेल्या घराचे स्मारक करण्यापर्यंतचे निर्णय राज्य शासनाने घेऊन त्यांना आदरांजली वाहिली आहे. लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्समध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संशोधन आजही संदर्भासाठी वापरले जाते. येथे डॉ. आंबेडकर फेलोशिप सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असून त्यावर राज्य शासन लवकरच निर्णय घेणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
केंद्रीय राज्यमंत्री श्री. अहिर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील सर्वांसाठीच कार्य केले आहे. त्यांनी नदीवर बंधारे बांधणे, कामगारांसाठी कायदे तयार करणे, आर्थिक स्थिती याबद्दलतचे विचार मांडले. त्यांच्या विचारांना आजही जगभरात मान्यता मिळत आहे. त्यांचे विचारानुसार कार्य करण्याचे काम कल्पना सरोज करत आहेत. (प्रतिनिधी)