भाजपाच्या साथीने बीडीडीचा विकास, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भुमीपूजन
By Admin | Published: April 22, 2017 01:40 PM2017-04-22T13:40:07+5:302017-04-22T13:43:29+5:30
बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी 32 टक्के जमिनीवर विकास करणार. मुंबईच्या पुनर्विकासाचा एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही असं आश्वासन दिलं. तसंच बीडीडीची जमीन ही सोन्याचा तुकडा असून बीडीडीच्या जमिनीवर बिल्डरांचा डोळा होता असंही सांगितलं. इच्छाशक्तीच्या अभावामुळे काम आधी झाले नाही असा टोलाही त्यांना यावेळी काँग्रेस - राष्ट्रवादीला लगावला. वरळीच्या जांबोरी मैदानात भव्य सभेच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
डिलाईल रोड, नायगाव, वरळी आणि शिवडी या परिसरात तब्बल २०७ बीडीडी चाळी आहेत. अवघ्या १६० चौरस फुटांच्या खोल्यांमध्ये १६ हजारांहून अधिक कुटुंबे वास्तव्यास आहेत. वर्षानुवर्षे मागणी, बैठका, निवदने आणि आंदोलनानंतरही ब्रिटिशांच्या काळात उभारलेल्या आणि जीर्ण झालेल्या या चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागला नाही. फडणवीस सरकारने अडीच वर्षांत जलदगतीने पावले उचलत प्रकल्पाची सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात डिलाईल रोड आणि नायगाव येथील चाळींचा पुनर्विकास केला जाणार असून, त्यासाठी कंत्राटदारांची नियुक्तीदेखील करण्यात आली. डिलाईल रोड येथील चाळींचे काम शापूरजी अँड पालोनजी तर नायगाव येथील चाळींचा पुनर्विकास एल अँड टी या कंपनीमार्फत केला जाणार आहे. वरळी येथील प्रकल्पाची निविदा काढण्यात आली असून, लवकरच कंत्राटदाराच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे सध्या १६० चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या चाळकऱ्यांना पुनर्विकासानंतर ५०० चौरस फुटांचे घर मोफत मिळणार आहे.
भाजपाच्या या आक्रमक श्रेयमोहिमेमुळे शिवसेना आणि काँग्रेसची मात्र पूर्ण कोंडी झाली आहे. नायगाव भागात काँग्रेसचे कालिदास कोळंबकर आमदार असून, वरळीत शिवसेनेचे सुनील शिंदे आमदार आहेत. तर, नगरसेवकांमध्ये शिवसेना आघाडीवर आहे. इतकी वर्षे पाठपुरावा करूनही ऐनवेळी सारे श्रेय भाजपाच्या वाट्याला जाणार अशी चिन्हे आहेत. शिवसेनेने स्थानिक पातळीवर पुनर्विकास प्रकल्पासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती देण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र, भाजपाच्या भव्य सोहळ्यासमोर तो तोकडा आहे.
नायगावातील काँग्रेसची स्थिती अगदीच केविलवाणी झाली आहे. काँग्रेसचे कालिदास कोळंबकर भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. कोळंबकरांचे तळ्यातमळ्यात सुरू असल्याने काँग्रेसमध्ये गोंधळाची स्थिती आहे. त्यातच कोळंबकरांनी आपल्या पोस्टरवर थेट मुख्यमंत्री फडणवीस यांचेच छायाचित्र छापल्याने काँग्रेसमध्ये नाराजी आहे.