सिंधी समाजाचे विकासातील योगदान उल्लेखनीय- राज्यपाल
By admin | Published: April 25, 2016 05:49 AM2016-04-25T05:49:03+5:302016-04-25T05:49:03+5:30
नव्या उमेदीने जीवन सुरू करीत सिंधी समाजाने उद्योजकता, कर्तबगारी व कठोर परिश्रम या गुणांच्या जोरावर प्रगती केली
मुंबई : देशाच्या फाळणीमध्ये सर्वस्व गमावूनदेखील महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये नव्या उमेदीने जीवन सुरू करीत सिंधी समाजाने उद्योजकता, कर्तबगारी व कठोर परिश्रम या गुणांच्या जोरावर प्रगती केली, तसेच राज्याच्या व देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासात उल्लेखनीय योगदान दिले, असे गौरवोद्गार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शनिवारी काढले.
भारतीय सिंधू सभा या संस्थेच्या मुलुंड येथील गुरु गोविंद सिंह महापालिका मैदानावर आयोजित केलेल्या ‘चेती चाँद मेला’ या सिंधी नववर्ष सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल बोलत होते. सिंधी बांधवांनी मुंबईत निर्माण केलेल्या अनेक शैक्षणिक संस्था आज गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहेत, असे सांगत सिंधी भाषा व संस्कृती टिकविण्यासाठी गुजरात येथील ‘इन्स्टिट्युट आॅफ सिंधोलॉजी’प्रमाणे मुंबईतदेखील एक उच्चशिक्षण संस्था निर्माण करावी, अशी सूचना राज्यपालांनी केली. कुलपती या नात्याने अशी संस्था निर्माण करण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
भारतीय सिंधू सभेने गैर सिंधी भाषिक विद्यार्थ्यांना सिंधी भाषा शिकण्यासाठी प्रेरित करावे व त्यासाठी शिष्यवृत्तीची तरतूद करावी, अशीही सूचना त्यांनी या वेळी केली. सिंधी समाजातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला आमदार सरदार तारासिंह, अखिल भारतीय सिंधू सभेचे अध्यक्ष लक्ष्मण चांदिरामाणी, कार्याध्यक्ष लधाराम नागवाणी, महासचिव राधाकृष्ण भगिया, महोत्सवाचे सचिव किशोर असवाणी व अनेक सिंधी बांधव उपस्थित होते.