मुंबईलगतच्या समुद्रातील बेटांचा विकास करणार
By admin | Published: January 23, 2016 03:12 AM2016-01-23T03:12:32+5:302016-01-23T03:12:32+5:30
कान्होजी आंग्रे बेटाचा विकास करून ते एक पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाल्यास कोकणच्या पर्यटनात एक मानाचा तुरा खोवला जाईल.
अलिबाग : कान्होजी आंग्रे बेटाचा विकास करून ते एक पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाल्यास कोकणच्या पर्यटनात एक मानाचा तुरा खोवला जाईल. पर्यटनवाढीसाठी मुंबईलगतची समुद्रातील बेटे विकसित करण्याचा विचार आहे. या बेटांचा विकास केल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले आहे.
थळ-अलिबागजवळच्या समुद्रातील ऐतिहासिक खांदेरी या बेटाचे कान्होजी आंग्रे बेट असे नामकरण करण्यात आले. या कान्होजी आंग्रे बेटावर प्रवासी जेट्टी उभारण्याच्या पायाभरणी समारंभात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, केंद्र शासनाने देशातील दीपगृह (लाइट हाऊस) असलेली बेटे विकसित करण्याचे नियोजन करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार राज्यातील कान्होजी आंग्रे बेटावरील विकासाचा हा समारंभ या योजनेचा शुभारंभ आहे. मुंबईलगतची बेटे विकसित केल्यास पर्यटनवाढीसाठी त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. यामुळे या ठिकाणी लोकांची वर्दळ वाढल्याने त्या ठिकाणची सुरक्षितताही राखली जाते. तसेच येथे अधिक सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे सीसीटीव्ही लावण्यात येतील. सन २०१७ हे वर्ष ‘व्हिजिट महाराष्ट्र’ म्हणून घोषित करण्यात येणार आहे. यामध्ये कान्होजी आंग्रे बेट हे पर्यटनस्थळ म्हणून त्यात समाविष्ट व्हावे, अशा दृष्टीने या बेटाच्या विकासाचे काम करावे. जलवाहतुकीमुळे वेळेची आणि इंधनाचीही बचत होते. त्यामुळे जलवाहतुकीसाठी तसेच वेस्टन फ्रंटलाइन जलवाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल. जलवाहतूक आणि पर्यटनाच्या वाढीच्या दृष्टिकोनातून राज्याचे नवे बंदर धोरण लवकरच करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दीपगृह बेटांचा (लाइट हाऊस) विकास करण्याच्या केंद्राच्या धोरणानुसार कान्होजी आंग्रे या बेटावर पर्यटनस्थळ निर्माण करण्यासाठी येथे प्रवासी जेटी सुरू करण्यात येणार आहे. या बेटाच्या विकासात पर्यटकांना राहण्यासाठी रिसॉर्ट, कॉटेज उभारण्यात येणार असल्याचे नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
(विशेष प्रतिनिधी)