लातूरमध्ये विकास हाच प्रमुख मुद्दा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 05:34 AM2019-04-12T05:34:08+5:302019-04-12T05:34:20+5:30
चुरशीची लढाई । तिसरी आघाडी कुणाची मते खाणार? अल्पसंख्याक कुणाच्या बाजूने?
प्रदीर्घ काळ केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या लातूर मतदारसंघातून भाजपची यापूर्वी दोनवेळा सरशी झाली. आता पुन्हा एकदा भाजप आव्हान देऊन जागा टिकविणार की, काँग्रेस पुन्हा विजय खेचून आणणार हे निकालानंतरच कळेल. परंतु, सद्य:स्थितीत भाजपने प्रचारात आघाडी घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेतून माहोल बनविला आहे. त्याला काँग्रेस प्रचाराच्या अंतिम टप्प्यात कसे तोंड देणार, हा प्रश्न आहे.
पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रतिष्ठा पणाला लावून सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी मिळवून दिली. विद्यमान खासदारांना तिकीट नाकारल्यानंतर झालेला वादही अंगावर घेतला. विरोधकांनीही टीकेची झोड उठविली. ज्या खासदाराने उत्तम काम केले, त्यांना तिकीट का मिळाले नाही, असा सवाल माजी राज्यमंत्री आ. अमित देशमुख यांनी उपस्थित केला. थेट उमेदवारीचे राजकारण आणि अर्थकारण चर्चिले गेले. परंतु, स्थानिक मुद्दे आणि आरोपांना न जुमानता निलंगेकर यांनी लोकसभेची निवडणूक देशहितासाठी असल्याचे सांगत प्रचार यंत्रणा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाभोवतीच उभी केली आहे. मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे हे भाजपच्या प्रचाराचे एकमेव सूत्र आहे.
आता प्रचार अंतिम टप्प्याकडे जात असून, भाजपने मोदी यांच्या सभेनंतर बनलेला माहोल टिकविण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्याचवेळी काँग्रेसने वारंवार स्थानिक मुद्द्यांना हात घालत भाजपच्या उमेदवारीचा वाद तेवत ठेवला आहे. मनपा, जिल्हा परिषदेमध्ये भाजपला सत्ता मिळूनही त्यांनी काय केले, केंद्र आणि राज्यातील सत्तेचाही लातूरला कोणता लाभ मिळाला, हा सवाल उपस्थित केला जात आहे. त्याला उत्तर देताना भाजपने रेल्वे डबे निर्मितीचा कारखाना, जलयुक्त शिवारची कामे सांगायला सुरुवात केली आहे.
मोदींनी जाहीर सभेमध्ये पुलवामातील शहिदांच्या नावावर मते मागितल्याचा विषय काँग्रेसने उचलून धरला आहे. पंतप्रधान बेरोजगारीवर बोलत नाहीत. जीएसटी, नोटबंदीवरही आता का बोलत नाहीत, हा काँग्रेसचा सवाल आहे.
दरम्यान, अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अहमदपूर आणि निलंगा येथे सभा घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या राम गारकर यांना चर्चेत ठेवले आहे. आता मतांचे विभाजन कसे आणि किती होणार? याकडे लक्ष लागले आहे. एकंदर, भाजप, काँग्रेसमधील रस्सीखेच प्रचाराच्या अखेरीस अटीतटीची होणार आहे.
मच्छिंद्र कामंत
लातूर शहर, लातूर ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसचा प्रभाव
आहे. तर कामंत यापूर्वी उदगीर विधानसभा मतदारसंघातून लढले असून, तिथे आघाडीने तुल्यबळ ताकद निर्माण केली आहे. अहमदपुरातही राष्ट्रवादीने भाजपला आव्हान दिले आहे. मात्र लोहा मतदारसंघातील चित्र अस्पष्ट आहे. मतदानापर्यंत येथील लढत रंगतदार होईल.
सुधाकर शृंगारे
पालकमंत्र्यांचा निलंगा मतदारसंघ तसेच अहमदपूर आणि उदगीरमध्ये भाजप आमदार ही शृंगारेंची जमेची बाजू आहे. मनपा, जि.प.त भाजपची सत्ता आहे. तर लोहा मतदारसंघाने भाजपला यापूर्वी मोठे मताधिक्य दिले होते. मात्र शहर आणि ग्रामीण मतदारसंघात भाजपला काँग्रेसशी टक्कर द्यावी लागेल.
कळीचे मुद्दे
भाजपचा प्रचार राष्ट्रहित, देशहित आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाभोवती फिरत आहे.
काँग्रेसने बेरोजगारी, दुष्काळ, कर्जमाफी, पीकविमा आणि भाजप उमेदवारी वादावर प्रचारचक्र सुरू ठेवले आहे.