‘बीडीडी चाळींच्या धर्तीवर जुन्या इमारतींचा विकास’
By admin | Published: June 8, 2017 06:49 AM2017-06-08T06:49:41+5:302017-06-08T06:49:41+5:30
जुन्या गृहनिर्माण संस्था यांचा बीडीडी चाळींच्या धर्तीवर पुनर्विकास करण्यासाठी पायलट प्रोजेक्ट करावा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील मोडकळीस आलेल्या इमारती, जुन्या गृहनिर्माण संस्था यांचा बीडीडी चाळींच्या धर्तीवर पुनर्विकास करण्यासाठी पायलट प्रोजेक्ट करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
उत्तर-मध्य मुंबई या खासदार पूनम महाजन यांच्या मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत बुधवारी मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. महाजन यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. मतदारसंघातील मोडकळीस आलेल्या इमारती, गृहनिर्माण संस्था यांचा पुनर्विकास करणे, परिसरातील वीज, पाणी, रस्त्यांचा प्रश्न सोडवणे, संरक्षण विभागाच्या अखत्यारीतील जमिनींचा विकास आदी विषयांवर बैठकीत चर्चा झाली. यावेळी मतदारसंघातील विविध विकासकामे त्वरित मार्गी लावावीत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.