उद्यानांच्या विकासाचा धडाका

By admin | Published: January 7, 2017 02:06 AM2017-01-07T02:06:08+5:302017-01-07T02:06:08+5:30

निवडणुकीच्या मोसमात विकासाची गाडी सुसाट असल्याचे चित्र आहे.

The development of the parks | उद्यानांच्या विकासाचा धडाका

उद्यानांच्या विकासाचा धडाका

Next


मुंबई : निवडणुकीच्या मोसमात विकासाची गाडी सुसाट असल्याचे चित्र आहे. आचारसंहिता लवकरच लागू होण्याची शक्यता असल्याने मतदारांवर प्रभाग पडणारे प्रकल्प झटपट मार्गी लावण्याची घाई सत्ताधाऱ्यांना लागली आहे. म्हणूनच यापूर्वी दुर्लक्षित राहिलेल्या प्रकल्पांच्या मार्गातील अडथळेही दूर होऊ लागले आहेत. यामध्ये रस्ते दुरुस्तीपाठोपाठ उद्यान, मैदान, मोकळ्या जागांचाही समावेश आहे. गेल्या वर्षी खर्चात कपात झालेल्या उद्यानांच्या विकास व देखभालीवर निवडणुकीच्या वर्षात तब्बल १८० कोटी रुपये खर्च होणार आहेत. यामुळे ठेकेदारांचे मात्र खिसे गरम होणार आहेत.
मुंबई महापालिकेची निवडणूक या वर्षी फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. तारीख जाहीर झाल्यावर आचारसंहिता लागू झाल्यास विकासाच्या नवीन प्रस्तावावर निर्बंध येईल. यामुळे आपापल्या वॉर्डमधील रखडलेले व महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्याची नगरसेवकांची धावपळ सुरू आहे. यासाठी राखीव निधी मंजूर करून त्यावर स्थायी समितीची मोहर घेण्यासाठी तातडीची बैठकही बोलावण्यात आली. या बैठकीत तब्बल १८० कोटी रुपये उद्यान व मैदानांच्या विकासासाठी मंजूर करण्यात आले. गेल्या वर्षी दोनशे उद्यानांच्या विकासासाठी शंभर कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र ठेकेदारांनी खूप कमी बोली लावल्यामुळे पुनर्निविदेत या निधीमध्ये कपात करून ४८ कोटी रुपये आयुक्तांनी मंजूर केले. इतक्या कमी रकमेच्या बोलीमुळे उद्यानांतील कामांच्या दर्जावर सवाल उठवला जात होता. निवडणुकीच्या वर्षात मात्र पालिकेच्या तिजोरीचे द्वार खुले झाले आहे. उड्डाणपुलांखालील जागांचाही विकास केला जाणार आहे. (प्रतिनिधी)
>११ महिन्यांसाठी तात्पुरते धोरण
उद्यान, खेळाचे मैदान, मोकळ्या जागा, रस्ते दुभाजक, उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागांच्या विकासासाठी ७९ ठेकेदार नेमण्यात आले आहेत. ५२५ उद्याने, ७४ रस्ते दुभाजक, ७६ वाहतूक बेटे, सात उड्डाणपुलांखालील जागा, ५८ स्ट्रीप उद्यान यांचा विकास होणार आहे. मुंबईत १ हजार ६८ उद्याने व मैदाने आहेत. एकूण १२०० एकर जागांवरही मैदाने-उद्याने आहेत.
उद्यान व मैदानाच्या देखभालीसाठी आणलेल्या नवीन धोरणाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती देत २३६ जागा ताब्यात घेण्याचे आदेश पालिकेला दिले होते. मात्र ११ महिन्यांसाठी तात्पुरते धोरण आणून जुन्याच संस्थांकडे असे मैदान व उद्यान देखभालीकरिता देण्यात आले आहे.

Web Title: The development of the parks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.