विकास आराखडा निधीअभावी जाणार वाहून
By Admin | Published: June 13, 2015 02:23 AM2015-06-13T02:23:15+5:302015-06-13T02:23:15+5:30
मुंबईतील मिठी नदीच्या धर्तीवर कल्याणातील वालधुनी नदीचा विकास करण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना करून विकास करण्यात येईल, अशी घोषणा तत्कालीन
बिर्लागेट : मुंबईतील मिठी नदीच्या धर्तीवर कल्याणातील वालधुनी नदीचा विकास करण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना करून विकास करण्यात येईल, अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांनी केली होती. यानंतर, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी ६२९ कोटींचा विकास आराखडा तयार करून सरकारकडे पाठविला. मात्र, अद्याप निधी न मिळाल्याने तो यंदाच्या पावसाच्या पाण्यात वाहून जाणार, असे वाटते.
मलंगगडावरून उगम पावणारी वालधुनी नदी एकेकाळी कल्याण तालुक्याची जीवनदायिनी ठरली होती. याच नदीवर इंग्रजांनी कल्याण स्थानकाला पाणीपुरवठा करणारा जीआयपी टँक बांधला होता. मात्र, काळानुरूप परिस्थिती बदलली. अंबरनाथमध्ये औद्योगिकीकरण झाले. नदीच्या काठांवर कारखाने झाले. त्यानंतर, उल्हासनगरातील जीन्स उद्योगांतून सोडण्यात येणाऱ्या रसायनमिश्रित पाण्याची भर पडली.
प्लॅस्टिक घनकचरा जमा होऊन नदीचा नाला कधी झाला, हे कळलेच नाही. त्यातच काठांवरील अतिक्रमणांमुळे नदीचे पात्र अरुंद व उथळ बनल्याने २००५ च्या अतिवृष्टीत सम्राट अशोकनगर, संजय गांधीनगर, हिराबाई रेणुका सोसायटी, शहाड फाटक आदी ठिकाणी झोपडपट्टीत पाणी घुसले होते. त्यामुळे या महापुरानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या विकास प्राधिकरण स्थापन करण्याच्या घोषणेनंतर आयुक्त सोनवणे यांनी ६२९ कोटींचा विकास आराखडा तयार करून २०११ मध्ये सरकारकडे पाठविला. यावर सरकारने समितीही नेमली. या समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात केवळ बैठकाच होतात. निष्पन्न काहीच होत नाही.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या प्रदूषित नद्यांच्या अहवालात महाराष्ट्रातील २८ नद्यांच्या यादीत सगळ्यात जास्त प्रदूषित नदी वालधुनीच असल्याचे म्हटले आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी केंद्राकडून ९ हजार २० कोटींचा निधी देण्यात येणार आहे. त्यापैकी काही निधी वालुधनी नदी विकासासाठी मिळणे अपेक्षित आहे. मात्र, सध्यातरी हा विकास आराखडा निधीअभावी पावसाच्या पाण्यात वाहून जाणार असेच दिसते. (वार्ताहर)