सिडनीच्या धर्तीवर बंदरांचा विकास
By Admin | Published: August 18, 2016 05:09 AM2016-08-18T05:09:29+5:302016-08-18T05:09:29+5:30
वेसाव्यासह राज्यातील प्रमुख मासेमारी बंदरांचा सिडनीच्या धर्तीवर सर्वांगिण विकास करणार असल्याचे आश्वासन मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी दिले.
मुंबई : वेसाव्यासह राज्यातील प्रमुख मासेमारी बंदरांचा सिडनीच्या धर्तीवर सर्वांगिण विकास करणार असल्याचे आश्वासन मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी दिले. शिवाय मत्स्यसंशोधन केंद्र हैद्राबादऐवजी वेसाव्याला आणण्यासाठी आपण ठोस प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
वेसावे येथे बुधवारी दुपारी साजरा करण्यात आलेल्या नारळी पौर्णिमेच्या सणात महादेव जानकर यांनी उत्साही सहभाग नोंदवला. यावेळी कोळीबांधवांशी दिलखुलास संवाद साधला. ते म्हणाले, वेसाव्याभोवताली वीस मजली गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या. मात्र कोळीबांधवांच्या घरांचा प्रश्न सुटलेला नाही ही खेदाची बाब आहे. मच्छीमार सोसायटयांना डीझेल परतावा लवकर मिळावा. वेसावे खाडीतील तीन लाख क्युबिक गाळ काढण्यात यावा. कोळी बांधवांच्या घरांचा प्रश्न सुटावा. कोळी बांधवांच्या जातीच्या दाखल्यांचा प्रश्न सुटावा. चित्रा-खलीजा जहाजांच्या टकरीत नुकसान झालेल्या मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा अनेक मागण्या सोडवण्यासाठी कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. (प्रतिनिधी)
- महादेव जानकर यांनी यावेळी कोळी पेहराव परिधान केला होता. वेसावे येथील मसानदेवी मंदिरापासून डोगरी गल्लीपर्यंत काढण्यात आलेल्या मिरवणूक ते सहभागी झाले होते. ही मिरवणूक मांडवीगल्ली मार्गे बाजारगल्लीमागील बंदरावर पोहचली. यावेळी त्यांनी समुद्राला सोन्याचा मुलाला दिलेला नारळ अर्पण केला.
- वेसावे गावातील ९ विविध गल्यांमध्ये कोळी गीतांच्या ठेक्यावर नारळी पौर्णिमेच्या मिरवणुका निघाल्या. तेरे गल्ली, बुधा गल्ली, गोमा गल्ली, पाटील गल्ली, बाजार गल्ली, मांडवी गल्ली, डोंगरी गल्ली, शिव गल्लीच्या अध्यक्षांनी सोन्याचा मुलामा दिलेला नारळ समुद्राला अर्पण केला.
- नारळीपोर्णिमेच्या निमित्याने घरात केलेल्या नारळाच्या करंज्याचा (पूर्ण्या) नैवेदय आपल्या बोटींना दाखवून पूजा केली. ‘सुमद्राची मनोभावे पूजा करून खोल मासेमारीला जाणाऱ्या आमच्या धन्याच रक्षण कर आणि यंदा आमच्या बोटीवरील जाळ्यात मुबलक मासोळी गावू दे’, अशी प्रार्थना कोळी महिला केली.
- कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील, सरचिटणीस राजहंस टपके, उपाध्यक्ष प्रकाश बोबडी, रामकृष्ण केणी, युवा अध्यक्ष चेतन पाटील, वेसावा कोळी जमातीचे अध्यक्ष मनोज भुनगवले, वेसावा नाखवा मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र काळे, मच्छीमार नेते प्रदीप टपके, वेसावा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष जयेंद्र लडगे, वेसावा सर्वोदय मच्छीमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष जयराज चंदी, पराग भावे, प्रवीण भावे, पृथ्वीराज चंदी, महेंद्र लडगे, पंकज जोनचा आदी यावेळी उपस्थित होते.